अण्णा गेले!! ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन; वयाच्या 88’व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. या बातमीने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अभिनेते जयंत सावरकर यांचा मुलगा कौस्तुभ सावरकर याने दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मागच्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर ठाण्यातल्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, रविवारी त्यांची तब्येत अचानक खालावल्यामुळे त्यांना संध्याकाळपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर हि झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी गेली सात दशकांहून अधिक कला मनोरंजन विश्वात काम केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतः अनेक कलाकार देखील घडवले आहेत. त्यांना अनेक कलाकार मंडळी ‘अण्णा’ म्हणून हाक मारत असे. अण्णांनी शेवटच्या क्षणापर्यंत रंगभूमीवर काम केले आहे. त्यांच्या निधनाने आज चित्रपटसृष्टीचं नव्हे तर रंगभूमीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सावरकर यांनी पु.ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकावर आधारीत त्याच शीर्षकाच्या नाटकात ‘अंतू बर्वा’ ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका अजरामर झाली. आजही त्यांनी साकारलेली हि भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात ते.

जयंत सावरकर यांचा जन्म १९३६ मधला अन त्यांचं मूळ गाव गुहागर. त्यांचा मोठा भाऊ मुंबईत नोकरीनिमित्त असल्यामुळे जयंत सावरकरदेखील मुंबईत आले. त्यांचं गिरणगावात दीर्घकाळ वास्तव्य होतं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सुरुवातीला १२ वर्षे बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले. शिवाय मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक आणि कार्यकर्ता म्हणूनही ते कार्यरत होते. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘किंग लिअर’ या नाटकात त्यांनी साकारलेला विदुषकदेखील प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला. शिवाय अलीकडेच स्वप्नील जोशी अभिनित सुहास शिरवाळकरांच्या ‘समांतर’ या कादंबरीवर आधारीत वेब सीरिजमध्ये त्यांनी ज्योतिषाची भूमिका केली होती. ती देखील प्रचंड गाजली.