हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे काल सोमवारी, २४ जुलै २०२३ रोजी निधन झाले. या बातमीने संपूर्ण सिने विश्वावर शोककळा पसरली. चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका, वेब सिरीज यांसारख्या विविध माध्यमातून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ते मनोरंजन विश्वात कार्यरत होते. त्यांनी गेली ७ दशकांहून अधिक काळ कला विश्वात काम केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतः अनेक कलाकार घडवले आहेत. त्यांना कित्येक कलाकार मंडळी ‘अण्णा’ म्हणून हाक मारत असे. अण्णा अनेकांच्या आयुष्यातील एक हळवा कोपरा आहेत आणि त्यामुळे आज त्यांना अखेरचा निरोप देताना जो तो भावुक झाल्याचे दिसले.
अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत अण्णांच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे आणि त्यांना श्रद्धाजंली वाहिली आहे. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार होणार आहेत. तत्पूर्वी ठाण्यात त्यांच्या पार्थिवाच्या अंत्य दर्शनासाठी त्यांचे चाहते, निकटवर्तीय आणि अनेक कलाकार मंडळी पोहोचले आहेत. अभिनेते जयराज नायर, मंगेश देसाई, मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर, सुशांत शेलार, अतुल परचुरे आणि अनेक कलाकार मंडळींनी जयंत सावरकरांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे.
या भावनिक प्रसंगी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त होताना म्हटले कि, ‘आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. त्यांनी आम्हाला बरंच काही शिकवलेलं आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याचा बऱ्याच वेळा योग आला. रंगभूमीशी एकनिष्ठ असावं म्हणजे काय याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अण्णा’.
‘दीपस्तंभ नावाची एक मालिका आम्ही केली होती. त्याच्यामध्ये आम्ही एका एपिसोडला 18 मिनिटाचा एक सीन वन शॉर्ट वन सीन केला होता. दोघांचाचं सीन होता. त्यावेळी अण्णांनी जे सांगितलं होतं ते माझ्या अजून लक्षात आहे. मी उभा राहतो ते केवळ रंगभूमीमुळे. रंगभूमीशी आपण एकनिष्ठ राहिलो की रंगदेवतेचे आशीर्वाद कायम आपल्याबरोबर असतात, असे ते कायम म्हणायचे. अण्णांचा फोन आला की पहिलं वाक्य, मराठी रंगभूमीचा विनम्र सेवक जयंत सावरकर बोलतोय.. असं असायचं. आज अण्णांच्या जाण्याने मला तर स्वतःला फार मोठी पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटते’.