हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट ३० जून २०२३ रोजी महाराष्टात सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासूनच कथानकाबद्दल एक विशेष ओढ कायम राहिली. हि ओढ आता चित्रपट गृहात मिळणाऱ्या प्रतिसादावरून किती प्रभावी आहे ते दिसत आहे. बघता बघता हा चित्रपट सर्व विक्रम तोडत एक नवा विक्रम तयार करताना दिसतोय. ‘बाईपण भारी देवा’च्या प्रेक्षकांची गर्दी कमाईचा आकडा दिवसेंदिवस वाढवते आहे. या सिनेमाचा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट पाहून लवकरच ‘सैराट’चा विक्रम मोडला जाणार असे चिन्ह दिसत आहे.
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने आतापर्यंत ६५.६१ कोटी इतकी कमाई केली आहे. या कमाईबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी माहिती दिली आहे. सोबतच त्यांनी या यशाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे कि, ‘ही तर श्री स्वामींची कृपा.. हा श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद.. मराठी सिनेमाच्या इतिहासात याची नोंद घेतली जाईल. स्त्री घर चालवते तर, सिनेमा तर निश्चितच चालवू शकते. सैराट नंतरचा बाईपण ठरला महाराष्ट्राचा महासिनेमा..’
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रमोशनने नव्हे तर माउथ पब्लिसीटीने प्रेक्षक दिला आहे. चित्रपटाची कथा, प्रत्येकीची एक एक गोष्ट आणि त्यातील भावनांनी स्त्रियांच्या काळजाला हात घातला आहे. शिवाय चित्रपटातील गाणी ही जमेची बाजू ठरली आहे. बॉक्स ऑफिसवर महिला प्रेक्षकांच्या सोबतीने हा सिनेमा महासिनेमा होण्याकडे मार्गस्थ झाला आहे. आतापर्यंत ६५ कोटींचे कलेक्शन केल्यानंतर लवकरच हा सिनेमा १०० कोटींची कमाई करेल अशी आशा आहे. असे झाल्यास शिंदेंचा ‘बाईपण’ मंजुळेंच्या ‘सैराट’वर भारी पडताना दिसेल हे नक्की!