शरद पोंक्षेंनी घेतली ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून एक्झिट; स्वतःच सांगितले कारण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ सध्या टीआरपीच्या बाबतीत चांगलीच फाईट देताना दिसत आहे. या मालिकेचे कथानक आणि त्यातील पात्रे प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहेत. या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस आलेले कानिटकर कुटुंब आता प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाले आहेत. मालिकेत एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केल्यामुळे हि मालिका तुफान लोकप्रिय आहे. मालिकेत ‘दादा काका’ हे पात्र साकारून अभिनेते शरद पोंक्षे यांनी प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केले होते. पण आता पाणी हि मालिका सोडली असून त्याचे कारण सांगितले आहे.

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील दादा काका हे पात्र थोडे गंभीर मात्र अत्यंत महत्वपूर्ण आहे. ही मालिका गेल्या २ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अर्थात हि पात्रदेखील गेल्या २ वर्षांपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अशातच मालिकेतील अत्यंत महत्वपूर्ण पात्र साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी मालिकेला रामराम ठोकला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे. तर मालिका का सोडली याचे कारण स्वतः शरद पोंक्षे यांनी सांगितले आहे. हा व्हिडीओ स्टार प्रवाहच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे

यामध्ये शरद पोंक्षे म्हणाले आहेत, ‘गेली दोन वर्ष स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी ही माझी मालिका चालू होती. त्यात मी विनायक कानिटकर हे पात्र साकारत होतो. पण काही कारणांमुळे आणि पुढे घेतलेल्या काही प्रोजेक्टमुळे मी ठिपक्यांची रांगोळी या मालिकेसाठी फारसा वेळ देऊ शकणार नाही. माझ्यामुळे त्या मालिकेचे नुकसान होऊ नये म्हणून ५०० भाग पूर्ण झाल्यावर मी ती मालिका सोडलेली आहे. माझ्या जागी माझा अत्यंत जवळचा मित्र आणि उत्तम अभिनेता उदय टिकेकर हे तुम्हाला विनायक कानिटकर ही भूमिका साकारताना दिसतील. तुम्ही मला जसं प्रेम दिलंत तसंच प्रेम उदय आणि त्याच्या व्यक्तीरेखेलाही द्याल अशी मला खात्री आहे. पुन्हा नवीन एखाद्या मालिकेतून किंवा नाटकातून भेटू’.