‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने घेतलं नवं घर; गरोदरपणात झाली स्वप्नपूर्ती


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री राधा सागरने काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर आपण गरोदर असल्याची माहिती दिली होती. यानंतर सोशल मिडीयावर तिने तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो तसेच व्हिडीओ शेअर केले होते. या आनंदाच्या बातमीने चाहते गदगदून गेले होते. यानंतर आता राधाने आणखी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. नुकतंच तिने आणि तिच्या पतीने एकत्र मिळून स्वप्नपूर्ती केली आहे. राधा आणि सागर यांनी हक्काचं असं स्वतःच घर घेतला आहे.

प्रत्येकाचं स्वतःच घर असावं हे स्वप्न असतंच आणि राधा- सागरचं हे स्वप्न नुकतंच पूर्ण झालं आहे. राधाने हि आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. राधा आणि तिचा पती सागर यांनी मिळून नुकताच पुण्यामध्ये नवा फ्लॅट खरेदी केला आहे. आपल्या हक्काच्या घराचा व्हिडीओ शेअर करत तिने पहिली झलक आपल्या चाहत्यांना दाखवली आहे. हा व्हिडीओ राधाने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडीओत राधा आणि सागर यांच्या नव्या घराची सुंदर झलक पहायला मिळत आहे. या व्हिडिओसोबत राधाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘स्वप्न पूर्ण झालंय, होम स्वीट होम’. तिच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी तसेच चाहत्यांनी कमेंट करत तिच्या आनंदात सहभाग घेतला आहे. राधा आणि सागर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राधाने अलीकडच्या काळात ‘आई कुठे काय करते’ आणि ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर ती अचानक मालिका विश्वातून गायब झाली होती. त्यानंतर तिने थेट गरोदरपणाची बातमी देत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.