‘तब तक के लिये.. अलविदा’; ‘स्टार प्रवाह’वरील मोरे कुटुंब घेणार प्रेक्षकांचा निरोप


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही छोट्या पडद्यावर मोठा प्रेक्षक वर्ग असणारी मालिका आहे. या मालिकेचे कथानक, पात्र सर्व प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाले आहेत. अशातच ही मालिका आता निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे. एक हजार भागांचा टप्पा पूर्ण करून या मालिकेचा शेवट गोड होणार आहे. मंगळवारी २५ जुलै २०२३ रोजी मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग झाले आणि हा क्षण मालिकेच्या टीमने एकत्र येऊन साजरा केला. दरम्यान मालिकेतील सुरू म्हणजेच अभिनेत्री नंदिता धुरीने एक पोस्ट शेअर केली आहे.

‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत अभिनेत्री नंदिता धुरीने ‘सुरू’ हे पात्र साकारले आहे. तिच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. यानंतर आता मालिकेला निरोप देताना सगळेच कलाकार भावुक झाले आहेत. दरम्यान नंदिताने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर मालिकेविषयी एक पोस्ट शेअर लिहिली आहे. यामध्ये नंदिता धुरीने मालिकेतील कलाकारांच्या पायांचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोसोबत नंदिताने कॅप्शनमध्ये एक कमाल शायरी लिहिली आहे. नंदिताने लिहिलंय,
‘फिर मिल बैठेंगे.. फिर गुफ्तगू होगी..
आपके हमारे किस्सों से.. ये महफिल फिर जवां होगी!
तब तक के लिये.. अलविदा!!
सर्वांना खूप सारं प्रेम. सर्वांची खूप आठवण येईल..’
नंदिताची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या मालिकेला निरोप देताना केवळ कलाकारचं नव्हे तर मालिकेचा प्रेक्षकवर्ग देखील भावुक झाला आहे. अनेकांनी कमेंट करत ‘मालिका बंद करू नका’, ‘आम्हाला तुमची खूप आठवण येईल’ असे म्हटले आहे.