‘धोती, सदरा, कोट आणि टोपी..’; आगामी चित्रपटात अभिनेते शरद पोंक्षे साकारणार ‘ही’ भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही टीआरपीच्या बाबतीत आघाडीवर आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या केवळ घरात नव्हे तर मनामनांत जागा मिळवली आहे. दरम्यान मालिकेत ‘दादा काका’ हे गंभीर मात्र अत्यंत महत्वपूर्ण पात्र साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकताच मालिकेला रामराम ठोकला आहे. त्यांच्या जागी आता मालिकेत अभिनेते उदय टिकेकर दादा काकांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. दरम्यान मालिका सोडल्यानंतर शरद पोंक्षे यांच्या आगामी सिनेमाची पहिली झलक नुकतीच समोर आली आहे.

‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सोडताना शरद पोंक्षे यांनी सांगितले होते कि, ‘मालिकेसाठी फारसा वेळ देऊ शकत नसल्यामुळे कुणाचे नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे’. यानंतर आता शरद पोंक्षे यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे लवकरच ते एका मराठी चित्रपटातून अत्यंत वेगळी आणि आव्हानात्मक भूमिकेतून आपल्या भेटीस येत आहेत. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला आणि यावेळी शरद पोंक्षे यांच्या भूमिकेची पहिली झलक पहायला मिळाली आहे.

अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. ज्याच्या कॅप्शमध्ये त्यांनी लिहिले आहे कि, ‘स्वरगंधर्व सुधिर फडके सिनेमाचा मुहूर्त सोहळा. मी डॉ हेडगेवार साकारतोय व मित्र सुनिल बर्वे सुधिर फडके’. या कॅप्शनमध्ये शरद पोंक्षे यांनी सांगितल्याप्रमाणे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या आगामी चित्रपटात ते डॉ. हेडगेवार ही भूमिका साकारत आहेत. धोती, सदरा, कोट आणि टोपी असा काहीसा त्यांचा लूक आहे. जो सोशल मिडीयावर आता व्हायरल होत आहे.