‘तुझं कौतुक थांबु नये..’; बायकोचा सिनेमा पाहून हेमंतने व्यक्त केला अभिमान


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट यांची मुख्य भूमिका असलेला ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ चित्रपट शुक्रवार २८ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत आहे. सिनेमाच्या प्रीमिअर शोसाठी क्षिती तिचा पती आणि प्रसिद्ध मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेला घेऊन गेली होती. हेमंतने बायकोचा सिनेमा पहिला आणि त्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना त्याने थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये हेमंत ढोमेने लिहीले कि, ‘पाटलीणबाई, आज तुझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिवस! करण सरांच्या ॲाफिस मधून फोन आल्याचं तू मला सांगितलंस आणि घाई घाईत लुक टेस्ट आणि त्यांच्याबरोबरची तुझी मिटींग आणि तारखा आणि बाकी सगळं ठरलं बघता बघता सिनेमाचं शूट झालं… हा सगळा प्रवास मी जवळून पाहिला… प्रिमियर शो ला तुझ्या सोबत आलो… “He is my husband!” अशी तू सगळ्यांना ओळख करून देत होतीस… काय भारी फिलींग होतं ते! त्या शो नंतर कोण कोण येऊन तुझं कौतुक करत होते… काय कमाल वाटत होतं!’ आज आपण आपल्या मित्रांसोबत सिनेमा पाहिला… तुझं काम आज पुन्हा एकदा बारकाईने बघत होतो! तुझी आजवरची मेहनत, स्वतःच्या जिवावर सारंकाही करण्याची जिद्द हळू हळू फळाला येतेय…’

पुढे लिहिलंय, ‘ सिनेमा संपल्यावर गर्दीतून लोक तुला भेटायला आले आणि त्या साऱ्यांनी तुझ्या साठी टाळ्या वाजवल्या… त्या टाळ्या कधी संपुच नयेत असं वाटत राहिलं… तुझं कौतुक कधीच थांबु नये असं वाटत राहिलं…हे सारं मी साठवून ठेवलंय कायमचं आणि आज तुला आवडत नसताना ही पोस्ट लिहीतोय… इतक्या भव्य दिव्य सिनेमात, एवढ्या मोठ्या नटांमधे, त्या सगळ्या झगमाटात तू लख्खं चमकत होतीस… तुझ्या कामाने! कमाल! क्षिती मला तू कायमंच आनंद दिलायस पण रॉकी आणि रानी की प्रेम कहानी या चित्रपटाबद्दल Thank you! आपणंच हे सारं केलंय, हे सग्गळं आपलंच यश आहे असं खुळ्यागत वाटणारा तुझा या जगातला सगळ्यात मोठा चाहता…खूप खूप मोठी हो, love you! (टिपः सिनेमा लवकरात लवकर बघा आपल्या क्षितीचं काम तुम्हाला नक्की आवडेल!)’