एक असंही BREAK- Up!! संतोष जुवेकरने सांगितला ‘तो’ किस्सा; म्हणाला, ‘तिने माझ्या अंगावर पैसे फेकले..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनामनांवर राज्य करणारा अभिनेता संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. अनेकदा विविध लूक, व्हिडीओ, किस्से आणि अनुभव सांगत तो चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतो. आजपर्यंत संतोषने चित्रपटात एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे नेहमीच त्याची काही ना काही कारणांमुळे चर्चा असते. अलीकडेच एका वाहिनीला त्याने मुलाखत दिली. ज्यामध्ये त्याने आपल्या ब्रेकअपचा एक भन्नाट किस्सा सांगितला आहे.

नुकताच संतोष जुवेकर, सोनाली कुलकर्णी आणि हेमंत ढोमे यांचा ‘डेट भेट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानिमित्त संतोषने ही मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत संतोषने आपल्या ब्रेकअपचा किस्सा सांगताना म्हटले कि, ‘मी तेव्हा लंडनला गेलो होतो. माझ्या गर्लफ्रेंडला वाटलं की मी तिथं दुसऱ्या मुलीला भेटायला चाललो आहे. मी तिला व्हिडीओ फोन करुन दाखवलं की मी मित्राकडे आलो आहे. पण तिच्या मनातला तो संशयाचा किडा काही जाईना. मग दोन दिवसांनी माझा नंबर ब्लॉक झाला’.

पुढे म्हणाला, ‘एक दिवस ती मला गोरेगावला भेटायला आली. ती मला म्हणाली मला तुझ्यासोबतचे हे नाते ठेवायचे नाहीये. मी म्हणालो ओके. मी कॉफी प्यायलो आणि वेटरला माझ्या कॉफीचे पैसे दिले. तिला म्हणालो तुझे तू भर. त्यानंतर ती रागाला आली आणि मला म्हणाली, तू किती नीच आहेस. मग तिने तिच्या पर्समधून ५०० रुपये काढले आणि माझ्या अंगावर फेकून ती रागाने ताड्कन निघून गेली. मग मी तेच ५०० रुपये वेटरला दिले कॉफी प्यायलो आणि निघालो’.