हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत चार दशकांहून अधिक काळ काम करत प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आशा काळे यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे आणि म्हणूनच त्यांना यंदाच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनादिवशी पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येईल.
पुण्यातील ‘बालगंधर्व रंगमंदिर’ हे सर्व कलाकारांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी या वास्तूचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. तर यंदाचा ५५ वा वर्धापन सोहळा २६ ते २८ जून या काळात विविध कार्यक्रमांसह साजरा केला जाणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी १० वाजता नांदी आणि गणेशवंदनेनं सुरु झालेल्या या महोत्सवाचे संध्याकाळी ४ वाजता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यानंतर २८ जून पर्यंत विविध कलात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये अगदी जादूचे प्रयोग, महाराष्ट्राची लोकधारा आणि बरेच असे कार्यक्रम असणार आहेत. या ४ दिवसीय कार्यक्रमाची २८ जून २०२३ रोजी संध्याकाळी ४ वाजता सांगता होईल.
दरम्यान आशा काळे यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला जात आहे. मराठी सिनेमे, नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून सोज्वळ तसेच दमदार अभिनयाने आशा काळे यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. बाळा गाऊ कशी अंगाई, कुलस्वामिनी अंबाबाई, कैवारी, तांबडी माती, थोरली जाऊ, चांदणे शिंपीत जा, चुडा तुझा सावित्रीचा, देवता, चोराच्या मनात चांदणे, माहेरची माणसे, हा खेळ सावल्यांचा हे आणि असे अनेक चित्रपट आशा काळे यांच्या दर्जेदार अभिनयाचे पुरावे आहेत.
शिवाय गहिरे रंग, गुंतता हृदय हे, एक रूप अनेक रंग, घर श्रीमंताचं, नल दमयंती, पाऊलखुणा, बेईमान, देव दिनाघरी धावला, मुंबईची माणसं, लहानपण देगा देवा, वाहतो ही दुर्वांची जुडी, संगीत सौभद्र, साटं लोटं अशा अनेक मराठी नाटकांमध्येही त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ज्या आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.