ज्याला मित्र नाही तो खडूस आणि करंटासुद्धा…; अमेय सांगतोय कशी असते ‘दिल दोस्ती दुनियादारी’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच सर्वत्र मैत्री दिन साजरा केला गेला. यानिमित्त बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर मित्र मैत्रिणींसोबतचे फोटो, व्हिडीओ आणि धमाल केलेले क्षण शेअर केले. यात अनेक सेलिब्रिटींचाही समावेश होता. या निमित्त ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय ठरलेल्या कार्यक्रमातील मध्यवर्ती भूमिकेत असलेली मंडळी आली होती. यावेळी अभिनेता अमेय वाघ याने मैत्रीविषयी अत्यंत मार्मिक आणि हृदयस्पर्शी अशा भावना व्यक्त करत सर्वांनाच थक्क केलं. त्याच्या या सादरीकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यामध्ये अमेय म्हणाला, ‘मित्रांनो आणि मैत्रिणींनो… व्हॉट्स अप.. नाही म्हणजे रसिकहो, प्रेक्षकहो, मंडळी नमस्कार… असं बरंच काही बोलता आलं असतं. नेहमीचाच काढा उगाळत आपल्यातलं बोलणं सुरू झालं असतं. पण मी मैत्रीचा धागा जोडला. जो असतो मजबूत तंबूसापेक्षा… इथे आपण जास्त खरे असतो आणि मूक गिळून बसलेल्या असतात आपल्या अपेक्षा.. मैत्री ही जन्माने होत नाही.. ना रक्ताने, ना धर्माने.. कळीच फुल होताना सहजासहजी दिसत नाही. तशीच मैत्रीसुद्धा ती आता होतेय हा.. असं सांगत बसत नाही. लंगोटी यार, बेस्ट फ्रेंड, चड्डी बडी हा लागतो प्रत्येक वयात.. जो आपल्याला लाईक करतो, मनातलं शेअर करतो आणि कधी मधी आपल्या हॉटेलचं मोबाईल बिल सबस्क्राईब करतो. प्रेम करायला विशिष्ट जागा लागते पण मैत्री कुठेही.. खरंच.. कुठेही करता येते. मुळात प्रेम हे एकतर्फी असू शकत पण मैत्री नाही. माझी तुझ्यावर मैत्री आहे.. असं कुणीच म्हणत नाही. मित्राची आठवण नाही येत. तल्लफ येते. गरजेला मित्र नसेल तर अशी घशाला कोरड बिरड पडते’.

मग एक किस्सा सांगत म्हणाला, ‘माझा एक मित्र उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून त्याच्या बायकोने सगळ्या मित्रांना फोन केला. सगळे म्हणाले, हे काय अगं माझ्याच घरी आहे… त्या दिवसापासून त्याच्या घरातून त्याचा आदर आणि त्याच्या मोबाईलमधून आम्हा सर्व मित्रांचे नंबर कायमचे हद्दपार झाले. मैत्री, दोस्ती अशीच असते. पुढे घेऊन जाणारी. ठेच लागल्यावर एवढ्या मोठ्या डोळ्यांनी फक्त काय मुली बघतोस..? या टोमण्यासोबत जखमेवर मलम पट्टी करणारी. मित्राचं एक वाक्य सुखावणारं असतं, ”एय.. एय .. ते बघ.. ते बघ ती तुझ्याकडेच बघतेय” .. आणि एका वाक्याची कायम भीती वाटते. जेव्हा थोडीशी घेतल्यावर मित्राचा आवाज येतो, ”भावा आज तुझी गाडी मीच चालवणार”.. मित्राची आई त्याच्या मित्रांना दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करते. ”त्याच्यासोबत दिसलास ना परत तर तंगडी तोडेन हा” .. किंवा ”शीक…अरे शीक कायतरी त्याच्याकडून”.. मी कायम दुसऱ्या कॅटेगरीमध्ये यायचो. कारण मित्राच्या आयांना माहिती नसायचं ”गंगाधर ही शक्तिमान है।”

‘खरतर मैत्री ही प्रत्येक नात्यात असायला हवी, असं म्हटलं तर त्यात काय वावग आहे..? आईशी मैत्री केली तर, आपसूकच तिचं काम आपण वाटून घेऊ. बाबांशी मैत्री केली तर, आहे त्या पॉकेट मनीतच रेटून नेऊ. नणंद, जाऊबाई आणि सासू मुलीची मैत्रीण झाली तर, अर्ध्या मालिका बंद होतील आणि नवरा बायकोची मैत्री झाली, तर काडीमोडाचे कज्जे बंद होतील. नात्यांचं नेटवर्क इतकं बिझी असत की कधी कधी संवादाची रेंजच मिळत नाही. पण मैत्रीच्या नेटवर्कच्या कांड्या नेहमी फुल्ल असतात. म्हणून तर मित्रांसोबत धमाल नेहमी ऑन असते आणि चिंता मात्र गुल्ल असतात. एकजण मला मध्ये म्हणाला ज्याला मित्र नाहीत तो जगतातला सगळ्यात खडूस माणूस. मी म्हटलं नाय नाय.. तसं नाय.. तसं नाय.. नुसता खडूस वगैरे नाही खडूस आणि करंटा सुद्धा.. आपल्याला लहानपणी पिगी बँक दिली जाते पैसे साठवायला.. त्यात किती जमले ते कुणालाच माहीती नसतं. मित्र हे आपले अशी पीगी बँक आहेत, ज्यामध्ये आपण आपली अशी सिक्रेट साठवतो जी कुणालाच माहीत नसतात. हा पीगी बँक कधीच फुटत नाही. मैत्री हे असं पुस्तक आहे जे कितीही जून झाल तरी फाटतच नाही. मित्र कसा निवडावा..? या प्रश्नाला काही अर्थ नाहीये. कुणीच मित्र निवडत नसतो.. ”मैत्री” ही त्या दोन लोकांना निवडत असते. मित्रांच्या जोड्या स्वर्गात नाही तर वर्गात बनतात. मग तो वर्ग शाळेचा असो कॉलेजचा असो किंवा जिथे आपली सर्वाधिक शाळा घेतली जाते ते आपल्या कामाचं ठिकाण असो. एकजण असतोच ज्याच्या आधाराची श्युरिटी असते.. नॉर्मल खोटंनाटं जगत असताना मैत्री हीच रिॲलिटी असते. मित्र किती लांब राहतो माहितेय..? फक्त एका कॉलच्या अंतरावर.. करा कॉल… त्याच्यासोबत क्षण सजवा. पुढे तेच करा कॅरी.. आयुष्यभर चालुदे आपली दिलं- दोस्ती- दुनियादारी’.