‘ज्यांनी घडवलं त्यांच्यासाठी…’; सराफ दांपत्याने केला 20 ज्येष्ठ कलावंतांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांची जोडी गेली दशकं मराठी कला विश्वात कार्यरत आहे. त्यामुळे त्यांचा स्वतःचा मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान ते कला विश्वातील अत्यंत आदर्श असे जोडपे म्हणून ओळखले जाते. त्यांचा आदर्श घेत कित्येक कलाकार घडले आहेत. अशा या जोडप्याने नुकताच ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ नावाचा एक नवा उपक्रम सुरु केला आहे. ज्याच्या अंतर्गत ज्येष्ठ रंगकर्मी, ज्येष्ठ कलाकार तसेच बॅकस्टेजवर काम करणारे तंत्रज्ञ आणि वयामुळे ज्यांना काम करणे शक्य होत नाही अशा गरजू कलावंतांना मदत केली जात आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांवर आणि विशेष म्हणजे नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी सुरु केलेल्या ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ या उपक्रमाचे आयोजन २९ जुलै २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात पडद्यामागील २० ज्येष्ठ कलाकारांना सन्मानित केले गेले. इतकेच नव्हे तर अशोक आणि निवेदिता सराफ यांनी सन्माननीय कलाकार मंडळींना प्रत्येकी ७५ हजारांची मदत केली. या उपक्रमाबद्दक अशोक सराफ म्हणाले, ‘मला ज्या लोकांनी मदत केली त्यांना मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. माझ्या कुटुंबाकडून या २० ज्येष्ठ कलाकारांना दिलेली ही लहानशी भेट आहे. यामुळे त्यांना मदत झाली तर मला आनंदच आहे. निवेदिताची ही सगळी कल्पना आहे. मी सुरुवातीला एवढ्या गोष्टी जुळून येतील की नाही..? म्हणून घाबरलो होतो. परंतु, सगळे लोक आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले’.

माहितीनुसार, या उपक्रमात अशोक सराफ यांना त्यांचे बंधू सुभाष सराफ यांची साथ मिळाली. तसेच अमेरिकेत राहणारे संजय पैठणकर यांनीदेखील १० लाखांची मदत केल्याचे अशोक सराफ यांनी स्वतः सांगितले. या कार्यक्रमात नंदलाल रेळे, अरुण होर्णेकर, विद्या पटवर्धन, उल्हास सुर्वे, उपेंद्र दाते, दीप्ती भोगले, सुरेंद्र दातार, हरीश करदेकर, शिवाजी नेहरकर, बाबा पार्सेकर, अर्चना नाईक, वसंत अवसरीकर, विष्णू जाधव, रवींद्र नाटळकर, प्रकाश बुद्धिसागर, पुष्पा पागधरे, एकनाथ तळगावकर, सीताराम कुंभार, किरण पोत्रेकर, वसंत इंगळे या २० ज्येष्ठ रंगकर्मींना सन्मानित करण्यात आले.