Nitin Desai : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या, ND स्टुडिओमध्येच घेतला गळफास


मुंबई । प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. देसाई यांनी स्वतःच्याच एन.डी. स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये देसाई यांचा मृतदेह आज सकाळी आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. देसाई यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय..? हे अद्याप अस्पष्ट आहे. नितीन यांच्या आत्महत्येचे वृत्त हे सिनेसृष्टीला मोठा धक्का देणारे ठरले आहे. (Nitin Desai Passed Away)

नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली..? याचा शोध सुरु आहे. मात्र देसाईंची अशी एक्झिट पचवणे सिनेसृष्टीसाठी अवघड ठरणार आहे. लगान, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, यासारख्या अनेक चित्रपटांना आपल्या कलादिग्दर्शनाचा साज देसाई यांनी चढवला होता. आपल्या कलेमुळे त्यांचं सिनेसृष्टीत एक वेगळं नाव तयार झालं होतं. देसाईंचे निधन हे चित्रपटसृष्टीचे न भरून निघणारे नुकसान आहे. आजतागायत त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अनेक मराठी, हिंदी चित्रपट तसेच ऐतिहासिक नाटिका. महानाट्यांसाठी सेट उभारले आहेत.

नितीन देसाई यांनी उभारलेले सेट हे कायम चर्चेचा विषय ठरत. इतकेच काय तर देसाई यांना त्यांच्या भव्य आणि उत्कृष्ट कारकिर्दीसाठी तब्बल ४ वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शिवाय देसाईंनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये फिल्म फेअर पुरस्काराचाही मान पटकावला आहे. ऐतिहासिक सेट आणि कलात्मक वास्तू म्हणून २००५ साली देसाईंनी कर्जत येथे भव्य एन. डी. स्टुडिओ उभारला अन याच स्टुडिओत त्यांनी आपला जीवनप्रवास संपवला.