‘बाईपण भारी देवा’चा सिक्वेल येणार…? केदार शिंदेंनी शेअर केलेल्या फोटोमुळे जोरदार चर्चा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट खरोखरच बॉक्स ऑफिसवर भारी पडला आहे. ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट पहायला महिला प्रेक्षक वर्गाने मोठी गर्दी केल्याचे आपण पाहिले. महाराष्ट्रातच काय तर महाराष्ट्राबाहेरही या चित्रपटाने प्रेक्षकांची चांगलीच गर्दी जमवली. महिन्याभरानंतरही हा चित्रपट अद्याप बॉक्स ऑफिसवर गाजताना दिसतोय. अशातच चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी शेअर केलेल्या एका फोटोमुळे ‘बाईपण भारी देवा’ दोन येणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

प्रचंड गाजलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची कथाकार वैशाली नाईक आणि लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार ओंकार दत्त यांच्यासह केदार शिंदे दिसत आहेत. ‘एक कहानी खतम तो दुजी शुरु हो गयी मामू.. बाईपण भारी देवा नंतर.. काहीतरी भारी..’, असं कॅप्शन देत केदार शिंदेनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोचे कॅप्शन ‘बाईपण भारी देवा’च्या सिक्वेलचे संकेत देत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती चित्रपट निर्माते दिग्दर्शक यांनी दिलेली नाही. त्यामुळे तूर्तास हि केवळ चर्चा आहे.

चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले असून स्वतः एक विक्रमी रेकॉर्ड तयार केला आहे. आतापर्यंत ३० दिवसात या चित्रपटाने ७० कोटी कमाई केली आहे. या यशाबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की,’आपण न मागता परमेश्वर भरभरून देतो.. तो नेमका कोणत्या रूपात प्रकट होतो? ते कधीच कळत नाही. यावेळी मात्र त्याचं रूप पाहिलं.. रसिक प्रेक्षकांच्या रूपातच परमेश्वर प्रत्येक चित्रपट गृहात अवतरला. आणि पदरात दान टाकून गेला.. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. परमेश्वर साथ सोडणार नाहीच, याची खात्री आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री सिध्दीविनायक महाराज की जय’.