‘आधुनिक, बोल्ड, मनोरंजनात्मक…’; बॉलिवूड सिनेमा ‘RRKPK’साठी अतुल कुलकर्णींची खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच प्रदर्शित झालेला करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणार असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या ५ दिवसांमध्ये ६० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटातून अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या जोडीने प्रेक्षकांना मोहित केले आहे. केवळ प्रेक्षक नव्हे तर समीक्षकांनीदेखील या चित्रपटाला पसंती दिली आहे. दरम्यान ‘नटरंग’ चित्रपटातून अभिनयाचे नवरंग दाखवलेले अतुल कुलकर्णी यांनीदेखील या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

https://www.instagram.com/p/CvZ55tMt1W6/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

आतापर्यंत दिग्दर्शक संजय जाधव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर या मराठी कलाकारांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले होते. यानंतर आता या यादीत अतुल कुलकर्णी यांचाही समावेश झाला आहे. अतुल कुलकर्णी यांनी करण जोहरचा फोटो आणि ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘चित्रपट!! आधुनिक चित्रपट हवा आहे? बोल्ड चित्रपट हवा आहे? एक मनोरंजक चित्रपट हवा आहे? व्यावसायिक चित्रपट हवा आहे? एक चांगला लिखित आणि तयार केलेला चित्रपट हवा आहे? या दशकातील चित्रपट हवा आहे? आधुनिक चित्रपट हवा आहे? असाच RRKPK आहे!!’ या कॅप्शनसह त्यांनी करण जोहर, रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांना पोस्ट टॅगदेखील केली आहे.

दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याने तब्बल ७ वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शनाची सूत्र हाती घेत आपली जबाबदारी अत्यंत अव्वलरित्या सांभाळली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांच्यासह अनेक बडे कलाकार आहेत. तसेच या चित्रपटात मराठी अभिनेत्री क्षिती जोग देखील अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.