‘निसर्गाच्या कवेत विलीन होणं किती भाग्याचं…’; रानकवी महानोरांना हेमांगीची आदरांजली


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या दोन दिवसात कला विश्वातून मोठ्या दुःखद वार्ता समोर आल्या. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या आणि निसर्गकवी नामदेव धोंडो महानोर यांचे निधन. देसाईंच्या निधनाने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. तर महानोर यांच्या निधनामुळे साहित्य जगतातील हिरव्या गर्द कविता पोरक्या झाल्या. या दिग्गजांच्या निधनाचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान देसाईंच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर हेमांगी कवीने सोशल मीडियाच्या माध्यमातून कवी ना. धों. महानोर यांनाही आदरांजली वाहिली आहे.

हेमांगीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलंय, ‘काल नितीन देसाई गेल्याची बातमी ऐकल्यापासून त्यांनी निर्माण केले भव्या दिव्य sets डोळ्यासमोर येत राहीले कुठल्या कुठल्या सिनेमातले आणि कानात एकच गाणं ऐकू येत होतं. त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या ‘अजिंठा’ सिनेमातलं… ‘मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले… घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले’ का कुणास ठाऊक..? रात्री याच गाण्यातली पावसाळी दृश्य पापण्यांवर तरळत राहीली आणि ओळी ऐकू येत राहील्या. अगदी झोप लागेपर्यंत! सकाळी उठले आणि कळलं आज ‘ना.धो. महानोर’ गेले! काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ती अशी! आज दिवसभर जैत रे जैत, एक होता विदूषक, मुक्ता, सर्जा मधली गाणी कानात घुमत राहतील! “काल्या एकल्या राती मन मोडून जाती.. असं एखादं पाखरू वेल्ल्हाळ.. ज्याला सामोरं येतया आभाळं” अलविदा, रानकवी!’

याशिवाय आणखी एक व्हिडीओ पोस्ट शेअर करत हेमांगीने लिहिलं, ‘आपल्या आवडत्या ऋतूत निसर्गाच्या कवेत विलीन होणं किती भाग्याचं! निसर्गकवी, रानकवीला ना.धों. महानोरांना न्यायला दस्तूरखुद्द पाऊस आला! तुमच्या शब्दांच्या पावसात कायम चिंब भिजत राहण्याचं भाग्य आम्हांला, आमच्या कित्येक पिढ्यांना दिल्याबद्दल!!’ हेमांगीने शेअर केलेल्या व्हिडिओत तिने खिडकीतून मळभ आलेले आभाळ दाखवले आहे. या व्हिडिओसोबत तिने ‘अजिंठा’ चित्रपटातील ‘मन चिंब पावसाळी’ हे गाणे बॅकग्राऊंडसाठी वापरले आहे.