‘आता वेळ झाली’.. दोन जीवांचा प्रेरक प्रवास; दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी एकत्र मोठ्या पडद्यावर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तुफान कामगिरी केली आहे. या चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला आहे. या चित्रपटात ‘माई’ हि भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रोहीणी हट्टंगडी यांनी साकारली आहे. नेहमीपेक्षा वेगळी मात्र तरीही लक्षवेधी अशी हि भूमिका रोहिणी हट्टंगडी यांनी उत्तम साकारली. या चित्रपटाला आणि त्यांच्या भूमिका प्रेक्षकांनी चांगले प्रेम दिल्यानंतर आता लवकरच त्या आणखी एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाचे नाव आहे ‘आता वेळ झाली’.

‘आता वेळ झाली’ या मराठी चित्रपटाची कथा एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट यंदाच्या हिवाळ्यात प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे कथानक हे खऱ्या आयुष्यातील व्यक्तिरेखांवर आणि त्यांच्या अनुभवावर बेतलेले आहे. त्यामुळे साहजिकच चित्रपटाची कथा ही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी, उत्सुकता वाढवणारी, गमतीदार आणि तरीही भावनात्मक विचारांनी मनात काहूर उठवणारी ठरणार आहे. दोन जीवांची साहसी आणि प्रेरक अशी हि कथा आहे. अस्तित्वाबद्दल चक्रावून टाकणारे अनेक प्रश्न निर्माण करणारा आणि तरीही हवाहवासा वाटणारा जीवनाचा प्रवास यातून घडणार आहे.

दिनेश बन्सल, अनंत महादेवन आणि जी के अगरवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, दिलीप प्रभावळकर हे मुख्य तर भरत दाभोलकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयवंत वाडकर, अभिनव पाटेकर हे इतर महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ‘आता वेळ झाली’ या छित्रपटाचे छायाचित्रण प्रदीप खानविलकर यांनी केले असून कुश त्रिपाठी, अनंत नारायण महादेवन यांनी त्याचे संकलन केले आहे. सिंक साऊड अँड साउंड डिझाईन हे भगत सिंग राठोड यांचे तर पार्श्वसंगीत संजय चौधरींचे आहे. ‘बाईपण भारी देवा’नंतर पुन्हा एकदा एका दमदार भूमिकेत रोहीणी हट्टंगडी यांना पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक झाले आहेत.