‘या पात्रासाठी शेवटचं तयार होताना..’; ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अवनीची भावनिक पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने गुरुवारी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेच्या शेवटचा भाग जरी गोड असला तरी मालिका संपताना निरोप घेणे प्रेक्षकांइतकेच कलाकारांनादेखील जड गेले. मालिकेतील अवनी हे पात्र साकारलेली अभिनेत्री साक्षी गांधीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मालिकेचा आणि तिने साकारलेल्या अवनीचा निरोप घेतला आहे. इंस्टाग्रामवर तिने ही पोस्ट शेअर केली आहे.

साक्षीने लिहिलंय, ‘२४ फेब्रुवारी २०२० या दिवशी चालू झालेला हा प्रवास आता तुम्हा सगळ्यांच्या आशिर्वादाने , प्रेमामुळे १००० भागांचा टप्पा गाठत आहे . अवनी ♥️अवनी सर्जेराव घोरपडे आणि लग्नानंतरची सहकुटुंब सहपरिवारमध्ये आलेली , सौ. अवनी वैभव मोरे . जर कुणी मला साक्षी म्हणून मला हाक मारली तर कदाचित पटकन कळणार नाही ,पण अवनी म्हटल्यावर आपसूक ओ.. म्हणते मी . मी नेहमी म्हणते की तुमच्या करिअर च्या सुरुवातीला तुम्हाला इतकं चांगल प्रोजेक्ट मिळणं आणि त्या मालिकेचे १००० भाग होणं ही खरच खूप भाग्याची गोष्ट असते . आणि त्यातली एक भाग्यवान मी’.

‘अवनी हे पात्र करत असताना मला सुरुवातीला अंदाज च यायचा नाही . मी हे जे करतेय ते प्रेक्षकाना आवडत असेल का ? आपण बरोबर करतोय का ? काही चुकतयं का ? आपल्यावर कुणी हसणार नाही ना ?? असे एक ना अनेक प्रश्न पडायचे. पण डोक्यात एक गोष्ट फिक्स होती की चिपळूण ते मुंबईपर्यंतचा पल्ला या निगेटिव्हिटीसाठी नाही गाठलेला. त्यामुळे साक्षी तू कामाप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा, मिळालेल्या कामाचा आदर ठेव.. या गोष्टी मी स्वतःला सतत सांगायचे. अवनी या पात्राच्या खूप शेड्स. अवनी अल्लड, हसरी, पटकन रागावणारी, रडणारी, स्पष्टवक्ती, स्वतंत्र, हळवी अशी होती. त्यामुळे खूप सांभाळून हे पात्र वठवाव लागायचं. आणि यासाठी मला भक्कम पाठिंबा, मदत केली, ते म्हणजे आमचे भरत सर… सर आज तुमच्यामुळे अवनी सगळयांना परिचयाची आहे’.

‘पहिल्या दिवशी जितकी भीती होती मनात तितकंच शेवटच्या दिवशी डोळ्यात पाणी होतं. अवनी या पात्रासाठी शेवटचं तयार होत असताना.. ती साडी, ती ज्वेलरी, ती टिकली.. अवनी हे पात्र अक्षरशः अंगात भिनलेल.. २ दिवसांच्यावर सुट्टी असेल तर बेचैन व्हायला व्हायचं आणि याच कारण म्हणजे उत्तम सहकलाकार. खूप भिती असायची मनात, या मोठ्या आर्टिस्टसमोर काही चुकायला नको. फम्बल व्हायला नकोत, रिटेक्स नकोत. पण सुनील दादा, किशोरी ताई, नंदिता ताई, सुहास ताई या सगळयांनीच आम्हाला संभाळून घेतलं. माझा ऑनस्क्रीन नवरा, आमचे अहो.. अमेय बर्वे.. तुला मी खूप त्रास देणारंच आहे. इथून पुढेसुद्धा… कोमल, पूजा, आकाश, पश्या, निम्या, मामा, सखी, गुड्डी, क्षितिज, श्वेता ताई लव्ह यू खूपपपप..’