‘बाप’ आई नसतो, कारण..; ‘बापमाणूस’ चित्रपटाच्या ट्रेलरने केला प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तब्बल ९ महिने आपल्या पोटात एक जीव वाढत असताना आई आणि त्या बाळाचं नातं फुलत असतं. आई आपल्या बाळाच्या सगळ्यात जवळ असण्याचं कारणचं हे आहे कि तीच नातं हे इतरांच्या आधी बाळाशी जोडलं जात. तिची भावनिक नाळ बाळाशी जोडली जाते. आई आणि तिचं मूल या नात्यातली ओढ काही वेगळीच असते. व्यक्त न करता जिला सगळं ठाऊक असतं, ती ‘आई’ असते. पण मग बाप..? बाळ आईच्या पोटात असताना त्याचंही नातं फुलत असतं. गर्भाचा अनुभव नसला तरी आईसोबत बाबासुद्धा बाळाची वाढ अनुभवत असतो. पण बाप आई नसतो.. कारण बाप हा बाप असतो. त्याच अस्तित्व हे मुलांच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्वाचं असतं. याच भावनेला उत्कटतेने मांडणारा एक चित्रपट येतोय.

अभिनेता पुष्कर जोग आणि बाल कलाकार केया इंगळे अभिनित ‘बापमाणूस’ हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात पुष्कर, केयासोबत अभिनेत्री अनुषा दांडेकर, कुशल बद्रिके आणि शुभांगी गोखले देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. जन्मताच आई गमावलेल्या चिमुकलीचा सांभाळ एकटा बाप कसा करतो आणि यावेळी त्याला कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागत..? हे या चित्रपटात आपल्याला पाहता येणार आहे. एकीकडे जीवनाची जोडीदार गमावल्याचे दुःख तर दुसरीकडे लेकीसाठी आई होण्याचा धीर एक बाप कसा आणतो याची प्रचिती ‘बापमाणूस’च्या कथानकातून येईल.

चित्रपटाचा ट्रेलर २ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांनीही भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही संवाद हे थेट हृदयाला भिडणारे आहेत. जसे कि.. ‘बाप हा आई नसतो.. कारण बाप हा बाप असतो’. प्रत्येक पुरुषाच्या मनातला ‘बापमाणूस’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रत्येक पुरुषाला आणि त्याच्यातील बापमाणसाला समर्पित आहे. योगेश फुलफगर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग यांनी केली आहे.