उमेश- प्रियाच्या ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ; पहिलाचं प्रयोग झाला हाऊसफुल्ल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट हे कायम चर्चेत असतात. ही क्युट जोडी सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. त्यांची केमिस्ट्री हि ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनसुद्धा अतिशय गोड आहे. हीच केमिस्ट्री घेऊन ते पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरले आहेत. मुख्य म्हणजे सुमारे एका दशकानंतर हि जोडी रंगभूमीवर धमाल नाटक घेऊन आली आहे आणि त्यांची अजूनही जादू चालतेय हे हाऊसफुल्लचा बोर्ड पाहून समजतंय.

एका दशकानंतर मराठी इंडस्ट्रीतील ‘क्यूट आणि परफेक्ट कपल’ प्रिया बापट आणि उमेश कामत रंगभूमीवर एकत्र आले आहेत. या कपलची पडद्यामागील केमिस्ट्री जितकी त्यांच्या चाहत्यांना आवडते तितकीच रंगभूमीवरील केमिस्ट्रीदेखील आवडते. हीच सुंदर केमिस्ट्री नाट्यरसिकांना ‘जर तर ची गोष्ट’ या नव्या नाटकातून पहायला मिळत आहे. सोनल प्रॅाडक्शन्स निर्मित, प्रिया बापट सादर करत असलेल्या ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचा नुकताच शुभारंभ झाला असून पहिल्याच प्रयोगासाठी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे.

अद्वैत दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत तर नंदू कदम या नाटकाचे निर्माते आहेत. शुभारंभाच्या प्रयोगाविषयी निर्माते नंदू कदम म्हणतात, ‘’ॲानलाईन, ॲाफलाईन तिकीटविक्री सुरू झाल्यापासूनच नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. शुभारंभाचा प्रयोग दणक्यात पार पडल्यामुळे खूप आनंद आहे. मला खात्री आहे, हे नाटक प्रेक्षकांना निश्चितच आवडेल. तिकीट न मिळाल्याने काही प्रेक्षक नाराजही झाले आहेत, मात्र त्यांच्यासाठी आम्ही लवकरच आणखी प्रयोग सादर करू. सर्व वयोगटाला आवडेल, असे हे कौटुंबिक नाटक आहे.’’