‘पाऊस, भजी आणि ट्रेकिंग..’; सह्याद्रीच्या डोंगर- दऱ्यात आकाश ठोसरची भटकंती


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पावसाळ्याच्या दिवसात अनेक तरुण मंडळी मित्र मैत्रिणींचा ग्रुप करून पावसाळी ट्रिप काढतात. निसर्गाच्या कुशीत, डोंगररांगांमध्ये, कडेकपाऱ्यात ट्रेकिंग करणाऱ्यांची या ऋतूत मोठी गर्दी पहायला मिळते. अशीच एक पावसाळी ट्रेकिंग ट्रिप आकाश ठोसरनेदेखील केली आहे. तीसुद्धा सह्याद्रीच्या निसर्गरम्य दऱ्या खोऱ्यांमध्ये. आपल्या वैयक्तिक आयुष्यात एक छोटासा ब्रेक घेऊन आकाश ठोसर थेट सह्याद्रीवर भटकंती करताना दिसला आहे. त्याने या ट्रिपचे काही व्हिडीओ, फोटो तसेच रिल्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे व्हायरल होत आहेत.

पावसाळ्याच्या दिवसात निसर्गाची भेट घेण्यासाठी मराठमोळा अभिनेता आकाश ठोसर सह्याद्रीच्या डोंगर रांगा सर करत विविध गडकिल्ल्यांना भेट देतोय. दरम्यान या ट्रेकिंगचे काही फोटो व्हिडीओ त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आकाशने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो गाडी चालवत घाट रस्त्याने एका गडावर पोहोचताना दिसतोय. या गडाचे त्याने नाव सांगितले नसले तरीही ‘सह्याद्री…’ असे कॅप्शन दिले आहे. गडावर जाताना आकाश ट्रेक करताना दिसतोय. या प्रवासात त्याला एक श्वान वाटाड्या म्हणून भेटला.

याआधी आकाशचा शितकड्यावर थरारक रॅपलिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता सह्याद्रीत ट्रेकिंग करतानाचे हे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. शीतकड्यावर रॅपलिंग केल्यानंतर आकाशने मस्त खडकांवर ठाण मांडला होता. या व्हिडिओत त्याच्या पाठीमागे दिसणारा धबधबा अत्यंत मनोवेधक आहे.

दरम्यान आकाशने धबधब्याजवळ खडकांवर बसून मस्त कांदा- बटाटा भजी बनवल्या. मग सगळ्यांनी मिळून भजी पावदेखील खाल्ला. पावसात गरमागरम भजी म्हणजे स्वर्गीय आनंदच. हाच आनंद लुटण्यासाठी अक्ष गडकिल्ले सर करतोय. दरम्यान नेटकरी उत्सुकतेने आकाशला त्याने ट्रेक केलेल्या या गडाचे आणि जागेचे नाव विचारत आहेत.