व्हॉट झुमका..? गाण्यावर अभिज्ञाचा भन्नाट डान्स; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, ‘बॉलिवूडची जादू…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ‘रॉकी और रानी कि प्रेम कहानी’ हा बॉलिवूडचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी अशा बड्या कलाकारांसोबत मराठी अभिनेत्री क्षिती जोगदेखील झळकली आहे. या सिनेमावर आणि यातील गाण्यांवर प्रेक्षक प्रचंड प्रेम करत आहेत. या सिनेमातील ‘व्हॉट झुमका’ गाणे तर कमालीचे व्हायरल झाले आहे. या गाण्यावर अनेक नेटकरी रिल्स बनवताना दिसत आहेत. यामध्ये मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेचा देखील समावेश आहे. तिनेही या गाण्यावर रील बनवून शेअर केली आहे. सोबतच क्षिती जोगचे कौतुक देखील केले आहे.

या व्हिडिओत अभिज्ञासोबत अभिनेत्री श्रेया बुगडे मध्येच मजेशीर टच देताना दिसते आहे. पण तरीही अभिज्ञाने लटके झटके देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओसोबत अभिज्ञाने लिहलंय, ‘या चित्रपटामुळे मी पुन्हा एकदा बॉलीवूडची जादू अनुभवली. यामध्ये सर्वांनी खूपच सुंदर काम केले आहे. आलिया भट्टला बंगाली मुलीच्या भूमिकेत पाहणे ही आमच्यासाठी एक ट्रीट आहे. रॉकी रंधावामुळे मी रणवीर सिंहच्या पुन्हा एकदा प्रेमात पडले आहे. त्याची एनर्जी, संपूर्ण चित्रपटातील अभिनय थक्क करणारा आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमची क्षिती जोग…दिग्गज कलाकारांसमोर तू जो अभिनय केला आहेस तो पाहून खरंच आम्हाला सर्वांना तुझा अभिमान वाटत आहे’. क्षिती जोगने हा व्हिडीओ रिशेअर करत अभिज्ञाचे आभार मानले आहेत.

‘रॉकी और रानी कि प्रेमकहानी’ या चित्रपटातून मराठी अभिनेत्री क्षिती जोगने रणवीर सिंग साकारत असलेल्या रॉकी रंधावाच्या आईची भूमिका साकारली आहे. तिने साकारलेल्या भूमिकेचे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये कौतुक केले जात आहे. अलीकडेच करण जोहरनेदेखील क्षितीच्या अभिनयाचे कौतुक केले होते. करण म्हणाला कि, ‘क्षितीचा अभिनय मी पाहिला असून ती एक गुणी अभिनेत्री आहे. मला खात्री होती ती या व्यक्तिरेखेला ती योग्य न्याय देणार. चित्रपट प्रदर्शित झाला असून क्षितीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्षिती अतिशय प्रोफेशनल अभिनेत्री आहे. कामाच्या बाबतीत ती अतिशय प्रामाणिक आहे. एखादी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ती जी मेहनत घेते, ते मी सेटवर पाहिले आहे आणि म्हणूनच ती कोणतीही भूमिका इतकी चपखल बजावू शकते’.