‘आमच्या प्रेतांच्या पायऱ्या रचाव्या लागल्या तरी चालतील, पण…’; ‘सुभेदार’चा रोमांचक ट्रेलर रिलीज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ने प्रेक्षकांना इतिहासाच्या अगदी जवळ नेलं आहे. आतापर्यंत या अष्टकातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ असे चार चित्रपट प्रदर्शित झाले. या प्रत्येक चित्रपटातून इतिहासाचं एक एक सुवर्ण पण उलघडण्यात आलं. यानंतर आता याच अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर आधारित ‘सुभेदार’ या चित्रपटाचा रोमांचकारी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘सुभेदार’ चित्रपटातच ट्रेलर रिलीज होऊन फक्त १३ तास उलटले आहेत आणि इतक्यात त्याला ३ लाखाहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या ट्रेलरच्या सुरुवातील आऊसाहेब कोंढाणा किल्ल्याबद्दल बोलताना दिसत आहे. यावर ‘पुढच्या एका महिन्यात कोंढाणा तुमच्या चरणाशी आणून नाही ठेवला, तर नाव शिवबा सांगणार नाही’, असे छत्रपती शिवाजी महाराज बोलताना दिसतात. मग तानाजी मालुसरे यांची एंट्री होते. तलवारबाजी, शिवरायांशी मैत्री- निष्ठा आणि कोंढाणा जिंकण्यासाठी लावलेली जीवाची बाजी… सोबतच सुभेदारकाच्या घरी लेकाच्या लग्नाची तयारी सुरु असताना बेलभंडारा उचलून, हात उंचावून ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी शपथ घेऊन गड जिंकण्यासाठी निघालेले सुभेदार यात पहायला मिळतात.

या ट्रेलरच्या शेवटी ‘म्या गेलो तर शेकडो तानाजी भेटत्यात, पर त्या समद्यांसनी मार्ग दाखवाया एक शिवाजी राजं हवं ना’, असा अत्यंत भावनिक प्रसंग आणि संवाद पहायला मिळतोय. या चित्रपटात अजय पूरकर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर आणि राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी दिसत आहेत. यांसह स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर, विराजस कुलकर्णी इत्यादी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या १८ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.