हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मी मोठा सुपरस्टार होणार… असं स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण गावाची वेस ओलांडून मुंबई सारख्या स्वप्ननगरीत येतात. काहींची स्वप्न लवकर पूर्ण होतात तर काही कलाकार मात्र शेवटपर्यंत झिजत राहतात. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे कायम अशाच नवोदित मात्र हरहुन्नरी कलावंताच्या शोधात असतात. रॉ टॅलेंटसोबत काम करणे हा जणू त्यांचा छंदचं. आजपर्यंत त्यांनी बऱ्याच नव्या चेहऱ्यांना आपल्या कलाकृतीचा भाग बनवत सिनेसृष्टीत लॉन्च केले आहे. यातील काही बडे कलाकार देखील झाले.
असाच एक नवा चेहरा दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि मकरंद माने यांच्या ‘बापल्योक’ या आगामी मराठी चित्रपटाद्वारे आपल्या भेटीला येतो आहे. ‘बापल्योक’ चित्रपटातून पायल जाधव ही नवोदित अभिनेत्री सिनेसृष्टीत दाखल होतेय. पायलचे वडील मूळ शेतकरी. पण पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांनी गाव सोडलं आणि पुण्यात आले. सरस्वती विद्यामंदिरमध्ये ते शिपाई कामाला लागले आणि इथेच पायलने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे पुणे युनिव्हर्सिटीतून मास्टर्स इन हेल्थ सायन्समधून तिने पदवी घेतली. तर ललित कला केंद्रमध्ये ‘मास्टर्स इन भरतनाट्यम’ केले आहे. कला क्षेत्राची आवड तिला आता सिनेसृष्टीत घेऊन आली आहे. ‘बापल्योक’ हा तिचा पहिलाच सिनेमा आहे.
या चित्रपटाबाबत बोलताना ती म्हणाली, ‘बापल्योक’ हा चित्रपट माझ्यासाठी स्पेशल आहे. या सिनेमाने मला नवी वाट दाखवली. मकरंदसर, शशांकसर, विजय शिंदे, नीनाताई, योगेश कोळीसर, विजय गावंडे सर यांच्याकडून मोलाचं मार्गदर्शन लाभलं. एक प्रयोगशील अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन’. ‘बापल्योक’ या चित्रपटासाठी आॅडीशनमधून पायलची निवड झाली आहे. कोणत्याही वशिल्याने किंवा ओळखीने ती या चित्रपट आलेली नाही असे, मकरंद माने यांनी सांगितले.
नागराज मंजुळे आणि मकरंद माने यांचा ‘बापल्योक’ हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. तर ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे, आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन मकरंद माने यांचे आहे.