हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीची गाजलेली मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ संपली असली तरीही या मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या मनात वसली आहेत. यश, नेहा, परी यांच्यासह मालिकेतील अन्य कलाकारांनीदेखील प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. मालिकेतील मीनाक्षी वहिनी ही सहाय्यक भूमिका देखील प्रचंड गाजली होती. नकारात्मक असली तरीही मीनाक्षी वहिनी प्रेक्षकांना भावली होती. हि भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वाती देवल आता लवकरच एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबाबत तिने स्वतःच माहिती दिली आहे.
अभिनेत्री स्वाती देवलने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने आपण नव्या मालिकेतून एका नव्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगितलं आहे. स्वाती म्हणाली की, ‘नमस्कार प्रेक्षकहो, आता मी लवकरात लवकर तुमच्या समोर येतेय. याबाबत सोशल मीडियावर मी नुसती एक पोस्ट शेअर केली, तर मला तुमच्यासारख्या प्रेक्षकांचे असंख्य संख्येने मेसेज आले.
त्यामध्ये प्रेम होतं, आशीर्वाद होते. काही जणांचे तर पत्रासारखे मेसेज आलेत, ते मी जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करतेय आणि हेच करत असताना मला असं लक्षात आलं की, तुम्ही एमटीआर (माझी तुझी रेशीमगाठ)मधल्या वहिनीवर खूप प्रेम करत होता आणि पर्यायाने ते प्रेम मला ही मिळतं होतं. असंच तुम्हाला माझ्या नवीन भूमिकेवर प्रेम करायचं आहे’.
‘“तुमची जास्त उत्सुकता न ताणता तुमच्याबरोबर माझी नवीन सुरुवात शेअर करतेय. ‘’सोनी मराठी’’वर रात्री ८ वाजता ‘’राणी मी होणार’’ ही मालिका २१ ऑगस्टपासून सुरू होतं आहे. तर या मालिकेतून नवीन रूपात आणि नवीन रंगात मी तुमच्या समोर येत आहे. जसं तुम्ही माझ्या एमटीआर मालिकेतील वहिनीवर प्रेम केलं, तसंच तुम्ही याही भूमिकेवर प्रेम करणार आहात. मला जास्तीत जास्त संख्येने मेसेज करणार आहात आणि खूप संख्येने माझ्यावर प्रेम करणार आहात, याचा मला पूर्ण विश्वास आहे’.