हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ यातील पाचवे चित्रपुष्प अर्थात आगामी मराठी चित्रपट ‘सुभेदार’ येत्या १८ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची गेल्या महिन्याभरापासून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या वीर पराक्रमाची गाथा या चित्रपटातून आपल्याला भव्य स्वरूपात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा रोमांचकारी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. याबाबत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
‘सुभेदार’ चित्रपटाच्या ट्रेलरने एका नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. हा ट्रेलर सध्या यु ट्युबवर चांगलाच ट्रेंड होतो आहे. नुसता ट्रेंड नाही तर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतोय. अर्थात प्रेक्षकांनी या चित्रपटाचा ट्रेलर सर्वाधिक पाहिला आहे आणि पसंती देखील दिली आहे. अत्यंत कमी वेळात सर्वाधिक चर्चेत आलेला असा हा ट्रेलर आहे. ‘सुभेदार’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्या काळातील देखावा दर्शवण्यासाठी मोठी मेहनत घेतल्याचे दिसते. सामाजिक परिस्थिती, तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील मैत्री, निष्ठा, प्रामाणिकपणा, शिवबा आणि राजमाता जिजाऊ यांच्यातील नाते, कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी सुभेदारांनी केलेली लढाई ते मालुसरे कुटुंबामध्ये सुरू असलेली रायबाच्या लग्नाची लगबग हे सगळं यात दाखवलं आहे.
इतकंच काय तर या ट्रेलरमधील काही संवाद अत्यंत भारावून टाकणारे आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या सगळ्या मराठी चित्रपटांच्या ट्रेलर्सपैकी सर्वात कमी वेळात सर्वात जास्त पाहिला गेलेला ट्रेलर हा बनला आहे. ‘सुभेदार’ हा ऐतिहासिक मराठी चित्रपट येत्या १८ ऑगस्ट २०२३ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळी, समीर धर्माधिकारी अशा बड्या कलाकारांची तगडी स्टारकास्ट आहे.