हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इरावती कर्णिक लिखित ‘जर तर ची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर अवतरले असून प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडत आहे. या नाटकातून बऱ्याच वर्षानंतर उमेश कामत आणि प्रिया बापट आपल्याला एकत्र रंगभूमीवर पहायला मिळत आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे. तर अभिनेत्री प्रिया बापटने तब्बल १० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन केले आहे. असे असूनही प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद हा अक्षरशः थक्क करणारा आहे.
याविषयी बोलताना प्रियाने एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने लिहिलंय, ‘रंगभूमीवर पुनरागमन करण्याचा माझा निर्णय एकदम योग्य होता. रंगभूमी म्हणजे थेट प्रक्षेपण, रंगभूमी म्हणजे ऊर्जा, देहबोली, तीव्रता, एनर्जीने काम करणे… चित्रपट आणि ओटीटीवर काम केल्यावर पुन्हा रंगभूमीवर वळणे थोडे आव्हानात्मक होते. परंतु, भरलेले नाट्यगृह, प्रेक्षकांचे प्रेम, त्यांची थेट मिळणारी दाद आणि टाळ्यांचा कडकडाट यापेक्षा सुखद अनुभव दुसरा कोणताच असू शकत नाही’.
‘माझ्या सहकलाकारांचे मी मनापासून आभार मानते ज्यांनी या संपूर्ण प्रवासात मला साथ दिली. रंगमंचावर काम करण्याचा हा प्रवास नक्कीच अविस्मरणीय आहे’. प्रियाने शेअर केलेल्या या व्हिडिओत ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाची सुरु असलेली तालीम, प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद आणि मुख्य म्हणजे कलाकारांची मेहनत आपण पाहू शकतो. ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचा नुकताच शुभारंभ झाला असून या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय आणि आशुतोष गोखले हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहे.