सिनेविश्वात पहिल्यांदाच.. नक्षलवादी होणार नायक; तृप्ती भोईरच्या नव्या सिनेमासाठी गडचिरोलीत ऑडिशन


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपट अगडबंब फेम अभिनेत्री आणि निर्माती तृप्ती भोईर यांनी आतापर्यंत बरेच विविध कथानकावर आधारलेले चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. पण आता पहिल्यांदाच निर्माती म्हणून तृप्ती भोईर एक धाडसी पाऊल उचलत आहेत. ‘कुर्माघर’ या प्रथेवर आधारित एक चित्रपट बनवताना त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कलावंतांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य म्हणजे हा हिंदी चित्रपट असणार आहे आणि यासाठी तृप्ती गडचिरोलीत दाखल झाल्या आहेत. गेल्या शनिवार २४ जून २०२३ रोजी त्यांनी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची ऑडिशनदेखील घेतली.

तृप्ती भोईर आणि विशाल कपूर यांनी नक्षलवादाचा मार्ग सोडुन गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या आत्मसमर्पितांच्या नवजीवन वसाहत येथे जाऊन हे ऑडिशन घेतले. यामध्ये विविध पुरुष तसेच महिला आत्मसमर्पित सदस्यांचा समावेश होता. या ऑडिशन दरम्यान त्यांनी आवाजाचे परिक्षण व मार्गदर्शन केले. आपल्या आगामी सिनेमाबद्दल बोलताना तृप्ती भोईर म्हणाल्या, ‘कुर्माघर प्रथेवर चित्रपट तयार करताना त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कलावंतांनाच घ्यावे असा माझा मानस आहे. आता आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची ऑडिशन घेतली आणि त्यात अनेक सक्षम कलावंत गवसले. या कलाकारांचे भविष्य उज्वल आहे. त्यातून त्यांच्यावरचा नक्षलवादाचा कलंक पुसला जाऊन जिल्ह्याची प्रतिमा उजळण्यास मदत होईल. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचे खूप खूप आभार’.

https://www.instagram.com/reel/Ct8CCP2qMuw/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

गडचिरोली जिल्हा हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा मानला जातो. येथे बहुतांश आदिवासी बांधव अतिदुर्गम भागात राहत असल्याचे आढळते. आजही ते जुन्या परंपरेनुसार जीवन जगतात. मासीक पाळीच्या दिवसात या भागातील महिला घराबाहेर एक छोटे घर बनवलेले असते त्यात राहतात.. ज्याला ”कुर्माघर” असे म्हणतात. यावरच आधारलेला चित्रपट तृप्ती भोईर तयार करत आहे. यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांनी चित्रपटात काम करावे व स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करावी याकरता प्रयत्न सुरु आहेत. तसेच ऑडीशन दरम्यान अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सागर झाडे व अंमलदार उपस्थित होते.