छत्रपती शिवरायांच्या पोशाखात असताना सेल्फी का देत नाही..? चिन्मयच्या उत्तराने जिंकलं प्रेक्षकांचं मन


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘सुभेदार’मुळे चांगलाच चर्चेत आहे. दिगपाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक मालिकेतील हा पाचवा चित्रपट आहे. या मालिकेतील सर्व चित्रपटांमध्ये चिन्मय मांडलेकरने महाराष्ट्राचे आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेत असताना चिन्मय स्वतःला काही बंधने घालून घेतो आणि याबाबत त्याने नुकताच एका डिजिटल माध्यमाला मुलाखत देताना खुलासा केला आहे.

आतापर्यंत चिन्मयने अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तो कायम या भूमिकेत लक्षवेधी ठरला आहे. पण तरीही शिवरायांच्या पोशाखात असताना तो कुणालाच सेल्फी देत नाही असे का..? हा प्रश्न अनेकदा चाहत्यांना पडला असेल. काहींचा याबाबत हिरमोड देखील झाला असेल. तर याबाबत चिन्मयने स्वतःच खुलासा केला आहे. ‘सुभेदार’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाचा पुण्यात भव्य कार्यक्रम पार पडला. याठिकाणी मीडियाशी संवाद साधताना चिन्मय म्हणाला, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करताना मी खूप नियम पाळतो. यातील सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे, मी शिवरायांच्या पोशाखात असताना केव्हाच कोणाबरोबरही सेल्फी काढत नाही आणि काढणार सुद्धा नाही. पूर्ण पोशाख, जिरेटोप घातलेला असताना अगदी देशाचे पंतप्रधान जरी आले तरीही मी सेल्फी काढणार नाही. तुम्हाला माझे त्या पोशाखातील सेल्फी फोटो सापडणार सुद्धा नाहीत’.

‘संपूर्ण पोशाख घातल्यावर, तयारी केल्यावर मी छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत असतो. त्यांचा मान राखलाच गेला पाहिजे. माझ्या या नियमामुळे अनेकांचा हिरमोड होतो परंतु, मी त्यांना सांगतो माझी तळमळ, भावना समजून घ्या… सेल्फी काढणे शक्य नाही, मी नकार देतो. जेव्हा प्रत्यक्ष लोकेशनवर शूटिंग सुरु असते, तेव्हा अनेक लोक तुम्हाला भेटायला किंवा शूट पाहायला येतात. अशावेळी त्या पोशाखाचा आणि महाराजांचा सन्मान करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे एकदा त्या भूमिकेत गेल्यावर मी सेटवर कोणतीही गोष्ट करताना मर्यादा आणि तारतम्य बाळगतो. कारण, महाराजांचा सन्मान राखणे महत्त्वाचे असते’. दरम्यान, बहुचर्चित ऐतिहासिक मराठी चित्रपट ‘सुभेदार’ चित्रपट येत्या १८ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.