हातात बॅग, शूज, कपडे.. सामानासकट भरकटलेल्या अवस्थेत दिसला अभिनेता; नेटकरी म्हणाले, ‘घरातून हाकललं का..?’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता कुशल बद्रिके हा खरंतर कॉमिक अभिनेता म्हणून प्रकाश झोतात आला. पण तो केवळ एक अभिनेता नव्हे तर तो एक उत्तम इंटरटेनर आहे. मालिका, चित्रपट, कॉमिक शो आणि सिरीज सारख्या विविध माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. दोस्तांचा दोस्त अशी कुशलची एक वेगळीच दुनिया आहे. अलीकडेच त्याने फ्रेंडशिप डेनिमित्त शेअर केलेली पोस्ट तुफान व्हायरल झाली होती. यानंतर आता त्याने शेअर केलेला फोटो हा चर्चेचा विषय ठरला आहे. हा फोटो पाहून तुम्हीही पहिला हाच विचार कराल कि, सगळ्या सामानासकट कुशल चालला कुठे..? किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल का..?

कुशलने स्वतःचा एक फोटो अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यासोबत त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी एक भन्नाट कॅप्शन लिहिलं आहे. कुशलने कॅप्शनमध्ये म्हटलंय कि, ‘स्वतःचे बूट, स्वतःचे कपडे, स्वतःची बॅग, स्वतःचा मेकअप, स्वतःचा प्रवासखर्च, जेवण सुद्धा घरचं… याचा अर्थ आज ‘स्ट्रगलर सालाचं’ “शुट्टू” आहे’. या फोटोत कुशलने ब्लॅक कलरची जीन्स आणि रेड- वाईट स्ट्रेट लाईन्सचे डिझाईन असलेला शर्ट परिधान केला आहे. त्याच्या हातात बॅग, शूज, लाईट ब्ल्यू जीन्स, रेड कलरचा कोट असं एकंदरच सगळं सामान दिसतंय. अत्यंत विस्कटलेला असा त्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कुशलने या कॅप्शनमध्ये म्हटल्याप्रमाणे आज ‘स्ट्रगलर साला’ सीरिजचे शूटिंग आहे आणि म्हणून हा सगळं अट्टाहास बरं का! ‘शुट्टू’ हा शब्ददेखील याच सिरीजमधून तुफान व्हायरल झालाय. कुशलच्या या फोटोवर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. काहींनी तर कुशलला ‘काय प्रॉब्लेम झालाय..?’, ‘काही मदत हवी आहे काय..?’ असेही म्हटले आहे. तर काहींनी ‘घरातून हाकललं वाटत’ असेही मजेत म्हटले आहे.

या पोस्टवर संतोष जुवेकरनेदेखील कमेंट केली आहे. त्याने लिहिलंय, ‘साल्या विजू देतो आपल्याला जेवायला….. निदान’. ‘स्ट्रगलर साला’ ही अत्यंत लोकप्रिय सिरीज आहे. ज्यामध्ये स्ट्रगल करणाऱ्या आर्टिस्ट मित्रांची धमाल आणि दुनियादारी दाखवण्यात आली आहे. यामध्ये दिग्दर्शक विजू माने, अभिनेता संतोष जुवेकर, कुशल बद्रिके आणि अभिजित चव्हाण हे मातब्बर कलाकार विविध संकल्पना घेऊन आपल्या भेटीस येतात.