हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी ही मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर इतकी सक्रिय असते कि नियमित ती काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसते. अशातच नुकताच ८ ऑगस्ट रोजी प्राजक्ताचा वाढदिवस झाला. आता प्राजुचा वाढदिवस आणि जत्रेकरी सेलिब्रेशन करणारी नाही असं कसं चालेल..? एकीकडे सोशल मीडियावर प्राजक्ताचे चाहते विविध पोस्ट, व्हिडीओ शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. तर दुसरीकडे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील कलाकार मंडळी आणि तंत्रज्ञ थेट प्राजक्ताच्या घरी धडकले होते.
प्राजक्ता ही सोनी मराठी वाहिनीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. या फॅमिलीतील ती एक अविभाज्य व्यक्ती आहे आणि म्हणून तिच्या वाढदिवसाचं खास दणक्यात सेलिब्रेशन करण्यासाठी जत्रेकरी तिच्या घरी पोहोचले होते. शोच्या टीमने प्राजक्ताच्या घरी तिच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन करण्यासाठी केक, क्रॅकरचे नियोजन केले होते. यावेळी समीर चौघुलेंनी प्राजक्ताचे औक्षण केले. तसेच प्राजक्ताने सचिन गोस्वामींचा पाया पडून आशीर्वाद घेतला. त्यानंतर केक कापून सेलिब्रेशन केलं.
यावेळी सचिन गोस्वामी, समीर चौगुलेंसह प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, चेतना भट, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब, वनिता खरात, प्रभाकर मोरे, अरुण कदम, श्याम राजपूत, रोहित माने आणि इतर विनोदवीर तसेच काही तंत्रज्ञ मंडळी देखील उपस्थित होती. प्राजक्ताने या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘बर्थडे सेलिब्रेशन…. या वाढदिवशी खूप हसावेसे वाटले… आणि या भन्नाट लोकांसोबत, माझी स्वतःची टीम, मित्र आणि महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या कुटुंबासह हा वाढदिवस खुप चांगला झाला… या सर्वांनी माझा दिवस खास बनवला. माझ्या सर्व चाहत्यांचे आणि फॅन पेजेसचे आभार मानू शकत नाही, तुमच्याकडून येणारी प्रत्येक शुभेच्छा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे! तुमच्या आशीर्वादाची गरज आहे’.