‘अनेक शपथा, अनेक वचनं, गेली अनेक वर्ष ऐकतोय, पण..’; महामार्गाची दुरावस्था पाहून हेमंत ढोमे भडकला


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. विविध पोस्टच्या माध्यमातून तो कधी व्यक्त होतो तर कधी विविध मुद्द्यांना हात घालत परखडपणे टीका करतो. अनेकदा सोशल मीडियावर तो सामाजिक तसेच राजकीय विषयांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भाष्य करताना दिसतो. आताही त्याने अशाच एका मुद्द्याला तोंड फोडले आहे. नुकतेच त्याने मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवर एक ट्वीट शेअऱ केलं आहे. ज्यामध्ये त्याने महामार्गाच्या खड्डे पडलेल्या फोटोंसह संताप व्यक्त करणारे कॅप्शन लिहिले आहे.

अभिनेता हेमंत ढोमेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरवर एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्याने मुंबई- गोवा महामार्ग रस्त्यांवरील खड्ड्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देताना हेमंतने खोचकपणे लिहिलं आहे कि, ‘ ”चांद्रयान ३”ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो! आता आपल्या रागाचं रूपांतर स्वतःचीच थट्टा करण्यात होत चाललं आहे!! भीषण!’ या ट्विटमध्ये हेमंतने या खड्ड्यांची तुलना चंद्रावरील खड्ड्यांशी केली आहे. हेमंतने शेअर केलेल्या या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यांपैकी एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘विद्यमान आमदारांनी एका वर्षात महामार्ग पूर्ण करण्याची शपथ घेतली आहे’. तर यावर हेमंतने रिप्लाय करताना लिहिले आहे कि, ‘अशा अनेक शपथा, अनेक वचनं गेली अनेक वर्ष आपण ऐकतोच आहोत! कुठल्याही पक्षाने, कुठल्याही मंत्र्याने, आमदाराने… काहीही केलेलं नाही!’ तसेच आणखी एकाने उपहासात्मक लिहिले आहे कि, ‘ढोमे साहेब रस्त्याचा फोटो टाका, मच्छरदाणीचा नाही’. यावर हेमंतने देखील तितकाच उपहास करत म्हटले कि, ‘चुकलं राव, माफ करा!’ अशाप्रकारे अनेक नेटकरी या ट्विटवर कमेंट करत संताप व्यक्त करताना दिसत आहेत.