‘पहिल्या पावसात भिजायला जात नाही मी..’; कुशल बद्रिकेची मान्सून स्पेशल पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पाऊस म्हटलं कि आपसूकच प्रत्येकाच्या मनात कवी उपजायला लागतो. पाऊस हा केवळ ऋतू नव्हे तर तो एक भावना आहे. या भावनेत चिंब व्हायला प्रत्येकालाच आवडत. गरमगरम भजी, उफ़ाळता चहा आणि सोबत ‘ती’. हे कॉम्बिनेशन तर जगात भारी आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होताच प्रत्येक तो तीच्या सरींमध्ये भिजण्यासाठी आसुसलेला आहे. अगदी असाच अभिनेता कुशल बद्रिके देखील प्रेम भावनेने व्यक्त झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो सोशल मीडियावर सुकून या नावाने काही ना काही लिहिताना दिसतोय आणि यावेळी त्याने प्रेम- पाऊस आणि ती असा मिलाप जुळवून आणला आहे.

गेली अनेक वर्ष विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा कुशल एक उत्तम लेखक देखील होऊ शकतो याचा कधीच कुणी विचार केला नसेल. पण जेव्हा कुशल सुकून या नावाने लिहितो तेव्हा अनेकांच्या मनात डोकावून गेलाय का काय…? असेच वाटते. दरम्यान कुशल बद्रिकेने पहिल्या पावसाच्या सरी कोसळताच एक सुंदर अशी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिलंय कि, ‘आता पहिल्या पावसात भिजायला जात नाही मी, कोसळू देतो त्याला तुझ्या आठवांसारखा. मात्र मनमोकळा श्वास घेतो भिजल्या मातीचा… तुझ्या केसांसारखा….(सुकुन)’. या पोस्टवर कुशलच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत त्याला पहिल्या पावसावर कविता करण्याची विनंती केली आहे.

एकाने या पोस्टवर कमेंट करत लिहिलंय कि, ‘ह्या पावसाळ्यात काही सुंदर कविता होऊन जाऊदेत कुशल… काही आताही तुझ्या मनात रुंजी घालत असतील…’. तर आणखी एका नेटकाऱ्याने म्हटलंय, ‘वर ढग आणि तुझी आठवण एकत्र दाटते, आयुष्य पुन्हा तिथेच नेवून ठेवावे असे वाटते,, पहिल्यांदा भिजलो तुझ्या जोडीला ज्या क्षणी पावसात,, पुन्हा आयुष्य तिथेच न्यावे असे प्रत्येक पावसात वाटते,, (जुनुन)’. तसेच अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘मन मोकळा श्वास ही…तिच्या केसासारखा …त्यातपण तिचीच आठवण’.