हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील ‘सुभेदार’ हा चित्रपट गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातून नरवीर तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा पहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीजकडे डोळे लावून बसले आहेत. ‘सुभेदार’ येत्या १८ ऑगस्ट २०२३ रोजी रिलीज होणार होता. पण रिलीज तोंडावर असताना त्याची रिलीज डेट पुन्हा बदलण्यात आली आहे. याबाबत स्वतः चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
या संदर्भात एक पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांची साथ मागितली आहे. यामध्ये लिहिलंय, ‘जय जिजाऊ, जय शिवराय!! नमस्कार.. छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार नरवीर तानाजीराव मालुसरे यांचा पराक्रम सिनेमागृहातून मोठ्या पडद्यावर आपणा सर्वांना अनुभवता यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु काही तांत्रिक गोष्टी आपल्या हातात नसतात. पण आम्ही सगळे सुद्धा तुमच्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. कोणत्याही अडचणीला न घाबरता आम्ही चित्रपट तुमच्या भेटीला आणणारच आहोत. यासाठी लागणारा काळ आणि तुमची साथ आम्ही तुमच्याकडे मागत आहोत. या तांत्रिक अडचणीवर मात करून श्री शिवराज अष्टकातले पाचवे पुष्प ”सुभेदार” दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित करीत आहोत. या अडचणीच्या काळात तुम्ही सर्व रसिक मायबाप आणि शिवभक्त आमच्या पाठीशी आधार बनून उभे राहाल, ही खात्री आहे. हर हर महादेव!!’
म्हणजेच येत्या १८ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होऊ घातलेला सुभेदार आता २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच रविवारी ‘सुभेदार’ चित्रपटाच्या टीमने मरीन्स ड्राईव्हवर ओपन प्रमोशन केलं. यावेळी ‘सुभेदार’ चित्रपटाची टीम तरुण मंडळींसोबत थिरकताना दिसली. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच ‘सुभेदार’च्या ट्रेलरने रिलीजनंतर अवघ्या २४ तासांत १ मिलियन व्ह्युजचा टप्पा पार करत ट्रेंडिंग नंबर १ मिळवून विक्रम केला आहे. अजूनही हा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.