हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज पोपटराव मंजुळे हे अत्यंत लोकप्रिय, प्रसिद्ध आणि आघाडीचे दिग्दर्शक आहेत. नागराज मंजुळेंनी आजतागायत समाजातील विविध विषयांवर अगदी खुलेपणाने भाष्य करणाऱ्या कलाकृती सिनेविश्वाला दिल्या आहेत. विविध कथानकांवर सिनेमा बनविण्याचे कौशल्य नागराज मंजुळे यांच्याकडे आहेच आणि याच जोरावर त्यांनी आजपर्यंत अबोल विषयांना वाचा फोडली आहे. दरम्यान त्यांचा आगामी चित्रपट ‘बापल्योक’ हा वडील आणि मुलाच्या अनवट नात्याची तरल कथा घेऊन येत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या टीमने तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले आहे.
बाप लेकाच्या नात्याची हळुवार गोष्ट घेऊन ‘बापल्योक’ हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. सध्या या चित्रपटाचा टिझर, ट्रेलर आणि गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रिलीजआधी ट्रेलर आणि गाण्यांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचे कारण बनतो आहे. अशातच रिलीज जवळ असताना चित्रपटाची टीम तुळजापुरात आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी चित्रपटाच्या टीमने भवानी आईसमोर नतमस्तक होत चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. ‘बापल्योक’चे शूटिंग तुळजापूर परिसरातील असून चित्रपटातील बहुतांशी कलाकार तुळजापूर, सोलापूर परिसरातील आहेत. त्यामुळे चित्रपटाचे आणि तुळजापूरचे खास कनेक्शन आहे.
मकरंद माने दिग्दर्शित या चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे दिसणार आहेत. तर त्यांच्या मुलाच्या भूमिकेत अभिनेता विठ्ठल काळे दिसणार आहे. सोबतच अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे यांच्याही चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाविषयी बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, ‘सरणारी वर्षं आणि वाढणारा सहवास यांच्या साथीने नाती मुरत जातात. अर्थात या नात्यात सूर गवसला तर आयुष्याचा प्रवास सुफळ संपूर्ण होतो. आजवर बाप लेकाचा प्रवास तेवढ्या ताकदीनं चित्रपटातून मांडला गेला नाही. मकरंद याला हा प्रवास मांडावासा वाटला. ही गोष्ट मला भावली आणि मी चित्रपटासाठी पुढाकार घेतला’.