‘सिंधुताई..’ मालिकेतील भूमिकेसाठी किरण मानेंवर कौतुकाचा वर्षाव; व्यक्त होत म्हणाले, ‘मी निःशब्द झालो..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मंगळवारी १५ ऑगस्ट २०२३ रोजी कलर्स मराठी या लोकप्रिय वाहिनीवर ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ हि नवी मालिका सुरु झाली आहे. २-३ भागांतच या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. हि मालिका दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारलेली आहे.

मालिकेत सिंधुताईंच्या वडिलांची म्हणजेच अभिमान साठे यांची भूमिका अभिनेते किरण माने साकारत आहेत. या भूमिकेत किरण माने इतके समरस झालेले दिसत आहेत कि अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. किरण मानेंच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीने त्यांच्या या भूमिकेचे कौतुक केले असून याबाबत त्यांनी पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

किरण मानेंनी आपल्या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘… पहिलाच सीन. सिंधुताईंचे वडिल अभिमान साठेंच्या रूपात मी तुकोबारायांचा अभंग म्हणतोय… “कर कटावरी, तुळशीच्या माळा… ऐसे रूप डोळा दावी हरी !” …आणि ज्यांनी माझ्यात तुकोबाराया रूजवला, मुरवला, भिनवला ते डाॅ.आ.ह. साळुंखे तात्या आवर्जुन सिरीयल पहायला बसलेत !…माझ्यासाठी अनमोल असलेला हा क्षण राकेशनं कॅमेर्‍यात टिपला आणि मला पाठवला. पाठमोरे तात्या हेडफोन लावून माझी सिरीयल पहातायत हे पाहून डोळ्यांत पाणी तरळलं. एपिसोड संपल्या- संपल्या आ. ह. तात्यांचा लांबलचक मेसेज आला : “अफलातून ! तुमचा अभिनय जबरदस्त आणि वऱ्हाडी भाषा तुमच्या तोंडी फक्कड ! हिंदी भाषेत सांगायचे, तर ‘आप तो परदे पर छा गये ।’ फारच छान. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!”‘

‘मी नि:शब्द झालो. गळा दाटून आला. इतके दिवस, आत… खूप आत दाबून ठेवलेली वेदना, एखाद्या जिवलगाने मायेचा स्पर्श करताच जशी धबधब्यासारखी बाहेर उसळते तसं काहीसं झालं…भावनांना वाट मोकळी करून दिली. गेल्या दीड वर्षांतले सगळे आघात, अपमान, अवहेलना सगळं सगळं धुवून निघाल्यासारखं लख्ख, शुभ्र काहीतरी वाटायला लागलं. भानावर येऊन मी तात्यांना रिप्लाय केला “खूप आभार” लग्गेच तात्यांचा पुन्हा मेसेज आला : “पुन्हा कधी आभार मानू नका. संत तुकाराम हा तर आपणा दोघांना घट्ट जोडणारा दुवा आहे. तुमची भूमिका पाहणे आनंदाचे आहे. चेहऱ्यावरचे भाव आणि एकूण अभिव्यक्ती खिळवून ठेवते. “बास ! अजून काय पायजे भावांनो. आता पुढच्या संघर्षासाठी परत ताजातवाना झालोय. सज्ज झालोय. “तुका म्हणे सुख झालें माझ्या जीवा। रंगलो केशवा तुझ्या रंगे॥”‘.