हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्पाल लांजेकर यांचे ‘श्री शिवराज अष्टक’ प्रचंड चर्चेत आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ यानंतर आता श्री शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’ येत्या २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर, त्यांच्या वीर यशोगाथेवर आधारलेला आहे. सध्या चित्रपटातील गाणी, ट्रेलर चांगलाच चर्चेत आहे. शिवाय चित्रपटाची संपुन टीम प्रमोशन ऍक्टिव्हिटीसाठी ठिकठिकाणी जाताना दिसते आहे. दरम्यान नुकतंच तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर यांनी आपल्या भूमिकेविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.
एका नामवंत माध्यमाशी बोलताना चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शूटिंग दरम्यानचा एक किस्सा सांगितला. या चित्रपटातील एक सीन शूट करताना अजय पुरकर यांना गंभीर दुखापत झाल्याचा खुलासा या मुलाखतीत केला गेला. याविषयी साविस्तर माहिती देताना अजय पुरकर म्हणाले, ”’श्री शिवराज अष्टक’’मधील चार चित्रपट आम्ही शूट केले. सुदैवाने कधीही दुखापत झाली नाही. पण ‘’सुभेदार’’च्या वेळी तो क्षणही आला. या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये माझ्या अंगाला लागून मशाल पडते आणि त्या मशालीवरून मला उडी मारून जायचं होतं, असा एक सीन होता. पण त्यावेळी नेमकी त्या मशालीमध्ये माझी कोल्हापुरी अडकली. त्यानंतर त्या मशालीच्या टोकाने माझ्या पायाच्या अंगठ्याच्या इथे गंभीर दुखापत झाली. मी तेव्हा दुर्लक्ष केले आणि दोन दिवस तसंच चित्रीकरण केलं’.
पुढे म्हणाले, ‘नंतर ते दुखणं वाढत गेलं. त्यानंतर मी डॉक्टरकडे गेलो. सहा टाके पडले. तेव्हा दिग्पाल आणि निर्मात्यांनी निर्णय घेतला की आपण थांबूया. कारण जखम तशी गंभीर आहे. आपल्याला या चित्रपटाचं शूटींग करायचं असेल तर त्याला आधी बरं वाटू द्या. तेव्हा ते सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले. मी एका महिन्यात ती जखम रिकव्हर केली. त्यानंतर पुन्हा आम्ही आणखी जोमाने शूट केलं. जे तुम्हाला आता ट्रेलरमध्ये दिसतय’. या चित्रपटात अजय पूरकर हे सुभेदार तान्हाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारत आहेत आणि याविषयी त्यांनी स्वतःला भाग्यवान देखील म्हटले आहे. चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर इत्यादी कलाकारांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.