प्रेमाच्या नात्यातील लळा दर्शवणार ‘चाहूल’; ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’मधील पहिले गाणे प्रदर्शित


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्रबोली क्रिएशन्स निर्मित, वन कॅम प्रोडक्शन्स सहनिर्मित ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’ ही वेबफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातून एका कलाकाराची जीवनगाथा उलघडणार आहे. दरम्यान या वेबफिल्ममधील ‘चाहूल’ हे सुरेल गाणे प्रदर्शित झाले आहे. नव्या नात्याचे पाऊल टाकणाऱ्या या गाण्याला अभय जोधपूरकर यांचा हृदयस्पर्शी आवाज लाभला आहे. तर निरंजन पेडगावकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मयूर करंबळीकर यांचे बोल लाभले आहेत. हळुवार फुलत जाणाऱ्या नवीन नात्याचं खूप सुंदर वर्णन या गाण्यातून केलं आहे.

चित्रबोली क्रिएशन्स निर्मित, वन कॅम प्रोडक्शन सहनिर्मित या वेबफिल्मचे दिग्दर्शन मयूर शाम करंबळीकर यांनी केले असून अक्षय विलास बर्दापूरकर ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’चे सादरकर्ते आहेत. तर आदित्य विकासराव देशमुख, वेदांत विवेक मुगळीकर हे निर्माते आहेत. गाण्याबद्दल दिग्दर्शक मयूर शाम करंबळीकर म्हणतात, ‘हे गाणे थेट मनाला भिडणारे आहे. अतिशय अर्थपूर्ण असे हे गाणे नवीन नात्यातील बंध दर्शवत आहे. हे तरल गीत संगीत प्रेमींना नक्कीच आवडेल’.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ या वेब फिल्मबद्दल बोलताना म्हणाले कि, ‘भावनिक आणि कौटुंबिक अशी ही वेबफिल्म आहे. कथेची मांडणी अतिशय सुरेख केली असून विचार करायला लावणारा हा विषय आहे. प्लॅनेट मराठीने नेहमीच वैविध्यपूर्ण विषय हाताळले आहेत. प्रेक्षकांना काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याच्या प्रयत्नात आम्ही नेहमीच असतो. त्यामुळेच असे वेगवेगळे विषय आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत’.