‘नवी सुरुवात.. नवा प्रवास.. नवा अध्याय..’; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री झळकणार हिंदी मालिकेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ हि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. नुकतेच या मालिकेने १ हजार भाग पूर्ण केले असून याचा टीआरपी कायम अव्वल राहिला आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक प्रचंड प्रेम करत आहेत. अरुधंती, यश, अनिरुद्ध, संजना, ईशा या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी उचलून घेतलं आहे. या मालिकेत ‘ईशा’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे आता लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

‘आई कुठे काय करते’मधील ईशाला म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरे आता लवकरच हिंदी मालिकेत झळकणार आहे. याबाबत स्वतः अपूर्वाने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर याबाबत माहिती दिली आहे. स्टार प्लसवरील ‘बातें कुछ अनकही सी’ या मालिकेत आता प्रेक्षकांची लाडकी ईशा अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचा एक प्रोमो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबत लिहिलंय, ‘एक नवी सुरुवात, एक नवा प्रवास, एक नवा अध्याय… आपण सगळे मिळून कुणाल आणि वंदनाच्या प्रेमाचे साक्षीदार होऊया. २१ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता स्टार प्लसवर ‘बातें कुछ अनकही सी’ही मालिका पाहायला विसरु नका’.

अभिनेत्री अपूर्वा गोरेने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टवर तिचे चाहते आणि कलाकार मंडळी कमेंटच्या माध्यमातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, ‘बातें कुछ अनकही सी’ या मालिकेत अभिनेता मोहित मलिक आणि मराठमोळी अभिनेत्री सायली साळुंखे मुख्य भूमिका साकारणार आहेत.