ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन; गंभीर आजराने होत्या त्रस्त


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी गंभीर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला आहे. सीमा देव या दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अभिनेता अजिंक्य देव यांच्या आई होत्या. अनेक चित्रपटात दर्जेदार अभिनय करून त्यांनी गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सिनेविश्वात त्यांची एक सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

माहितीनुसार, अभिनेत्री सीमा देव यांना २०२० साली अल्झायमर्स या आजाराचे निदान झाले होते. याबाबत त्यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्वीटरवर ट्विट करत माहिती दिली होती. गेली ३ ते ४ वर्ष सीमा देव या आजराशी दोन हात करत होत्या. पण अखेर हि झुंज अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली आहे. सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी आज सकाळी ७ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४.३० वाजता दादरमधील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ आहे. त्यांनी आपल्या पाहिल्याच चित्रपटात रमेश देव यांच्यासोबत काम केलं होते. तेथूनच दोघांची जोडी सुपरहिट ठरली. यानंतर रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये एकत्रित काम केलं. प्रेक्षकांना सुद्धा ही जोडी चांगलीस पसंत पडली. सीमा देव यांनी ‘सरस्वतीचंद्र’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आनंद’, ‘कोशिश’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये , भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं.