‘आई गेल्याने कुटुंबात…’; सीमा देव यांच्या निधनावर मुलांची भावनिक प्रतिक्रिया


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत मराठी अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सीमा देव यांचे आज २४ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले. या दुःखद बातमीने संपूर्ण सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ८१’व्या वर्षी सीमा देव यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी ७ वाजता त्यांचं बांद्रा येथील राहत्या घरी निधन झाल्याची माहिती त्यांचे सुपूत्र अभिनय देव यांनी दिली.

आईच्या निधनानंतर त्यांची दोन्ही मुलं कोलमडून गेली आहेत. अभिनय देव म्हणाले कि, ‘आईच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे’. तर अभिनेते अजिंक्य देव म्हणाले कि, ‘आज माझी आई सीमा देव यांचं निधन झालं. आज सकाळी ७ वाजता ती गेली. गेली ३ ते ४ वर्षे ती अल्झायमरने ग्रस्त होती आणि तिला पूर्ण विस्मृती झाली होती. बाबांना जाऊन आता दीड- पावणेदोन वर्षे झाली. आईला काही आठवत नव्हतं, काही कळत नव्हतं. पण ती आमच्याबरोबर होती. मात्र आता आई- बाबा दोघेही नाहीयेत. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबात एवढी मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ते मी सांगू शकत नाही’.

सीमा देव यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ५ वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांनंतर आता आईच्या निधनाने देव भावंडांचे मातृछत्रदेखील हिरावले गेले आहे. तर सिनेसृष्टीतील सोज्वळ अभिनेत्रीला निरोप देताना संपूर्ण कलाविश्व गहिवरले होते. सीमा देव यांनी गेली अनेक वर्ष मराठी कलाविश्वात एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे आज त्यांना निरोप देताना चाहतेही प्रचंड भावुक झाले. ‘त्यांनी साकारलेल्या भूमिका या कायम स्मरणात राहतील’, ‘अशी सोज्वळ अभिनेत्री पुन्हा होणे नाही’, असे म्हणत नेटकऱ्यांनीदेखील सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.