‘चंद्रावर बसणारा पहिला भारतीय’; अभिनेता सचिन पिळगांवकरांची ‘ती’ पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारताची ‘चंद्रयान – ३’ हि अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम देशाने यशस्वीपणे पूर्ण केली आहे. यामुळे प्रत्येक भारतीय आनंद साजरा करत आहे. इस्रोने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘विक्रम’ लँडर आणि ‘प्रज्ञान’ रोव्हर सॉफ्ट लँडिंग केलं आणि एक भव्य इतिहास रचला. भारतीय वेळेनुसार पाहता संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. दरम्यान जगभरातून इस्रोच्या वैज्ञानिकांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतं आहे. सोशल मीडियावर नेटकरी, विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि सिने विश्वातील कलाकार देखील पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. दरम्यान अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी शेअर केलेली पोस्ट तुफान व्हायरल होत आहेत.

इस्रोचं संपूर्ण जगातून कौतुक होत आहे. या कामगिरीसाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. अशातच अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी ‘चंद्रयान- ३’ बद्दल जी पोस्ट शेअर केली आहे ती तुफान व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी एव्हरग्रीन चित्रपट ‘अशी ही बनवाबनवी’मधील एक खास क्षण शेअर केला आहे. सचिन पिळगांवकर यांनी शेयर केलेल्या फोटोत दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे दिसत आहेत, ज्यांनी या चित्रपटात परश्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांनी स्त्री व्यक्तिरेखा देखील साकारली होती. त्यांनी साकारलेली पार्वती ही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली.

चित्रपटात पार्वतीच्या डोहाळे जेवणादरम्यानच्या सीनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये पार्वती म्हणजेच अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे चंद्रावर बसलेले दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर शेयर करतांना अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘चंद्रावर बसणारा पहिला भारतीय’. सध्या सचिन पिळगांवकर यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टवर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. ज्यामध्ये काहींनी लक्ष्याची आठवण काढली आहे तर काहींनी मात्र या फोटोसोबत ‘चंद्रयान – ३’च्या यशाची तुलना केल्यामुळे संताप व्यक्त केला आहे.