सांगलीच्या पठ्ठ्याला राष्ट्रीय पुरस्कार; महिलांच्या आयुष्यातील अडचणींवर बनवला माहितीपट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आणि यामध्ये सांगलीच्या शेखर बापू रणखांबे या दिग्दर्शकाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्याचे समोर आले आहे. शेखर बापू रणखांबे यांच्या ‘रेखा’ या चित्रपटाला सामाजिक विषयावरील माहितीपट ज्युरी अॅवॉर्ड मिळाला आहे. तासगाव तालुक्यातील पेड या भागातील शेखर रणखांबे यांनी आतापर्यंत बनवलेल्या जवळपास सर्व लघुपटांचे विषय हे सामाजिक आशय असलेले आहेत. रेखा या लघुपटात माया पवार या पारधी समाजातील आणि अशिक्षित युवतीने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.

दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी ‘रेखा’ या लघुपटाच्या माध्यमातून अत्यंत महत्पूर्ण विषय मांडला आहे. आपण रस्त्याशेजारी राहणाऱ्या महिला पाहिल्या असतील. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. या महिला त्यांच्या आरोग्याबाबत सतर्क नसतात. त्यांच्या आयुष्यातील अडचणी मांडणारा ‘रेखा’ हा माहितीपट महिलांच्या मासिक पाळी आरोग्याच्या वाईट स्थितीकडे आपले लक्ष वेधतो. याबाबत बोलताना रणखांबे म्हणाले कि, ‘या विषयावर संशोधन करत असताना या महिला किती अस्वच्छ असतात आणि त्या दिवसेंदिवस अंघोळ करत नाहीत ते समोर आले’.

‘रेखा’ या मराठी माहितीपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरल्याने सांगलीकरांनी अभिमान व्यक्त केला आहे. या माहितीपटात नायिका रेखा ही रस्त्याच्या कडेला राहणारी महिला आहे. जी त्वचेच्या बुरशीजन्य संसर्गाने ग्रस्त असते. डॉक्टर तिला आंघोळ कर आणि औषध लाव असा सल्ला देतात. पण तिचा नवरा तिला अडवतो आणि तिच्याशी दुर्व्यवहार करतो. रेखा आंघोळ करण्यासाठी प्रयत्न करते पण जेव्हा तिच्या समाजातील महिला तिला आंघोळ न करण्याचे कारण सांगतात तेव्हा ती हादरते. मग द्विधा मनस्थितीत ती आपल्या पतीला सोडण्याचा निर्णय घेते. जेणेकरून तिला संसर्गावर उपचार करण्यासाठी आंघोळ करता येईल. या संपूर्ण कथेत रेखा तिच्या स्वच्छतेसाठी कसा संघर्ष करते ते पहायला मिळत आहे.