हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. विविध विधानांमुळे आणि वक्तव्यांमुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. अशातच त्यांनी अभिनेत्री भार्गवी चिरमूलेच्या ‘गप्पा मस्ती’ या पॉडकास्टमध्ये बोलताना धर्मांविषयी भाष्य केले आहे. बौद्ध, जैन, लिंगायत आणि शीख धर्माबद्दल वक्तव्य करताना शरद पोंक्षे म्हणाले कि, हे सगळे हिंदू आहेत. त्या हिंदू धर्माच्याच पोटशाखा आहेत. त्यामुळे हे धर्म वेगळे नसून सगळे राम, कृष्ण व भगवद्गीताच मानतात.
अभिनेते शरद पोंक्षे यावेळी बोलताना म्हणाले कि, ‘बौद्ध, जैन, लिंगायत सगळे हिंदूच आहेत. त्या आमच्याच शाखा आहेत. फक्त त्यांच्या उपचार पद्धती वेगळ्या आहेत. गौतम बुद्ध दुसऱ्या राष्ट्रातून आले नव्हते. ते आमच्याच मातीत जन्माला आले होते. त्यांना आमचाच एक अवतार म्हणतात. त्यांनी फक्त कर्मकांडांची पद्धत वेगळी करून टाकली. बौद्ध धर्म, जैन आपल्यापासून वेगळे होऊ लागले आहेत. शीख वेगळा धर्म आहे म्हणे, कुठला वेगळा धर्म आहे.. ? या सगळ्या मूळ हिंदू धर्माच्या पोटशाखा आहेत’.
या संदर्भात मुंबई आणि उपनगरांचं उदाहरण देताना ते म्हणाले कि, ‘जसं आधी मुंबई कुलाबा ते वांद्र्यापर्यंत होती, मग वाढत वाढत उपनगरं झाली. तसंच मूळ हिंदू धर्माची उपनगरं आपण या धर्मांना म्हणू शकतो. काही उपचार पद्धती त्यांनी वेगळ्या बनवल्या. ते वेगळ्या कुठल्या अल्लाहची प्रार्थना नाही करत, येशूची नाही करत. जैन, बौद्ध, लिंग वा शीख कोणीही वेगळ्या देवाची प्रार्थना करत नाहीत. सगळे राम आणि कृष्णालाच मानतात, भगवद्गीताच मानतात. आता हे सगळं पसरवलं पाहिजे. त्यामुळेच लोकप्रियतेचा वापर करून व्याख्यानं सुरू केली’.