महाराष्ट्रातील शाळकरी विद्यार्थ्यांना फक्त 140 रुपयांत पाहता येणार ‘सुभेदार’; निर्मात्यांची खास ऑफर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’ नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवसापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘सुभेदार’ चित्रपटाची प्रचंड हवा आहे. ‘सुभेदार’ चित्रपटात इतिहासातील अत्यंत महत्वाचे पान उलघडण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी पहावा यासाठी निर्मात्यांनी प्रयत्न केले आहेत. नुकतीच त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एक खास ऑफर दिली आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊया.

‘सुभेदार’ हा चित्रपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पहावा. आजच्या पिढीला इतिहास समजायला हवा म्हणून ‘सुभेदार’च्या निर्मात्यांनी महाराष्ट्रातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एक खास ऑफर दिली आहे. यासंबधित एक पोस्ट शेयर करत त्यांनी ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये लिहिलयं की, ‘महाराष्ट्रातल्या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी PVR INOX ची विशेष ऑफर ! तिकीट दर फक्त रु. १४० /-‘. यासोबत काही अटी देखील आहेत. त्या पुढीलप्रमाणे :-

० अटी

शोची वेळ सकाळी ११ च्या आधी असणे आवश्यक आहे.

आठवड्याच्या दर सोमवार ते गुरुवार फक्त दिवसांसाठी वैध.

कन्फर्मेशन आणि पेमेंट ४८ तासांपूर्वी आले पाहिजे.

सकाळी ११ च्या आधी ज्या वेळेस त्यांना पीव्हीआर आणि आयनॉक्स स्क्रीनची आवश्यकता असेल, ती वेळ देण्यात येईल.

प्रत्येक शोसाठी किमान तिकीट बुकिंग १०० तिकिटे असावी’.

या अटींची पुर्तता केल्यानंतरच शालेय विद्यार्थी या ऑफरचा लाभ घेवू शकतील. यासाठी संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘शालेय विद्यार्थ्यांसाठी तिकिट दर रु.१४०/* फक्त. PVR INOX घेऊन आले आहेत एक विशेष ऑफर.. वरील पोस्ट नीट वाचा आणि गृप बुकींग साठी संपर्क करा!’ हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला असून पहिले दोन दिवस आणि रविवारची कमाई मिळून ‘सुभेदार’ने ५. २५ कोटींची कमाई केली आहे.