‘सुभेदार’ चित्रपटात अलका कुबल यांनी साकारली ‘ही’ प्रभावशाली भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांच्या भव्य यशानंतर ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या मालिकेतील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट असून यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पहायला मिळतेय. चित्रपटातील कलाकारांनी आपल्या भूमिका इतक्या अव्वल वठवल्या आहेत कि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. या चित्रपटात अनेक ज्येष्ठ कलाकार झळकले आहेत. ज्यामध्ये वयाच्या ९३ व्या वर्षी दिग्दर्शक राजदत्त यांचा समावेश आहे. शिवाय अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांनीही महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

‘सुभेदार’ या चित्रपटातील मुख्य कलाकारांशिवाय अन्य कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांचे देखील कौतुक केले जात आहे. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यादेखील ‘सुभेदार’ या चित्रपटाचा भाग आहेत. या चित्रपटात अलका कुबल यांनी अत्यंत छोटी मात्र प्रचंड प्रभावशाली अशी भूमिका साकारली आहे. अलका कुबल यांनी ‘जना गराडीन’ ही भूमिका साकारली असून छत्रपती शिवाजी महाराजांसह त्यांचा एक खास सीन चित्रपटात आहे. अलका कुबल यांनी साकारलेली ‘जनाई’ ही भूमिका चित्रपटाच्या शेवटपर्यंत प्रभाव ठेवते. या भूमिकेबाबत ‘सुभेदार’ प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेता चिन्मय मांडलेकरने खुलासा केला होता.

त्यावेळी चिन्मय मांडलेकरने सांगितले होते कि, ‘महाराष्ट्राच्या सगळ्यात लाडक्या ताई अर्थात अलका कुबल यांनी ‘’सुभेदार’’ चित्रपटात छोटी पण अत्यंत सुंदर अशी भूमिका केली आहे. त्यांच्याबरोबर माझे दोन सीन्स आहेत. मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे कारण, माहेरची साडी आम्ही चित्रपटगृहांमध्ये जाऊन अनेकवेळा पाहिला होता. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे’. याशिवाय ‘सुभेदार’मध्ये अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी या कलाकारांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.