BB मराठी फेम मेघा धाडेची भाजपात महत्वपूर्ण पदावर नियुक्ती; पोस्ट शेअर करत म्हणाली..


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलाकार मंडळी कलाविश्वाइतकेच राजकीय क्षेत्रातही सक्रिय आहेत. गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी विविध पक्षाशी हातमिळवणी केल्याचे समोर आले आहे. अनेकांनी वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या पदांचा भार स्वीकारला आहे. नुकताच बिग बॉस मराठी फेम अभिनेता अभिजीत केळकर याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याचे समोर आले. यानंतर आता भाजपाने बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती अभिनेत्री मेघा धाडेचीदेखील पक्षात महत्वपूर्ण पदावर नियुक्ती केल्याचे समोर आले आहे.

यासंदर्भात अभिनेत्री मेघ धाडेने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. मेघाने जून महिन्यात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मेघाच्या राजकीय कारकीर्दीला जुनमध्येच सुरुवात झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री मेघा धाडेने भाजपात प्रवेश केला होता. यानंतर आता मेघाची चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

यासंदर्भात माहिती देताना शेअर केलेल्या पोस्टमध्ये मेघा धाडेने लिहिलंय की, ‘आज माझी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांच्या उपस्थितीत माझी महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच माझ्याबरोबर अनेक कलाकारांचे पक्षप्रवेश करण्यात आले. मला प्रिया ताईंनी जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडून अनेक कलाकारांना पक्षाशी जोडून जोमाने काम करीन हा जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार….’.