‘मंगळसूत्रात ओवले काळे मणी…’ सुपर्णा श्यामची थाटात मंगळागौर; उखाण्यातून जिंकलं नवरोबाचं मन


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकार मंडळी लग्न बंधनात अडकले. यांपैकी एक म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेता संकेत पाठक. त्याने सुपर्णा श्यामसोबत लग्नगाठ बांधली आणि नुकतीच संकेतने बायकोची पहिली मंगळागौर मोठ्या थाटामाटात साजरी केली आहे. या मंगळागौर सोहळ्याचे काही फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडिओत सुपर्णाने संकेतसाठी उखाणा घेतल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ तर तुफान व्हायरल होतोय.

मराठी मालिका विश्वात सुपर्णा श्याम आणि संकेत पाठक ही जोडी प्रचंड चर्चेत असते. या दोघांचा विवाहसोहळादेखील चाहत्यांमध्ये चर्चेत आला होता. यानंतर आता नुकतीच सुपर्णाची लग्नानंतर पहिली मंगळागौर पूजन आणि खेळ साजरे करण्यात आले.

यावेळी सुपर्णाने नटण्याची आणि मंगळागौर खेळण्याची हौस पूर्ण करून घेतली आहे. अत्यंत थाटामाटात हा मंगळागौरीचा कार्यक्रम साजरा केला गेला. यासाठी एक हॉल बुक करण्यात आला होता. जिथे सुपर्णा आणि संकेतच्या कुटुंबातील इतर स्त्रिया तसेच मित्र परिवारातील मैत्रिणी सामील झाल्या होत्या.

यावेळी मंगळागौरीची पूजा पूर्ण करून सर्व महिलांनी संध्याकाळी खेळ खेळले. दरम्यान मंगळागौरीमध्ये सुपर्णाने घेतलेल्या उखाण्याने मात्र विशेष लक्ष वेधले. मंगळागौरीला सुपर्णाने आकाशी रंगाची नऊवारी साडी नेसली होती आणि त्यासोबत पारंपरिक दागिन्यांसह लूक पूर्ण केला होता. यावेळी सुपर्णाने संकेतच्या नावाचा खास उखाणा घेत म्हटले, ‘मंगळसूत्रात ओवले काळे मणी, त्यात ओवले सोन्याचे मणी, त्यात ओवलं डोरलं.. संकेत रावांच्या मनावर मी माझं नाव कायमचं कोरलं’. बायकोचा उखाणा ऐकून नवरोबा संकेतही घायाळ झाला तर उपस्थितांनी तिचे कौतुक केले.