‘इतक्या प्रेमाने इतकं सुंदर..’; चाहतीने दिलेली भेट पाहून मधुराणी झाली भावुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक घरात हि मालिका पाहिली जाते. या मालिकेतील आईचे अर्थात अरुंधतीचे पात्र साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर तर प्रेक्षकांच्या कुटुंबांचा एक भाग झाली आहे. त्यामुळे लोक अरुंधतीवर अर्थात मधुराणीवर अगदी जीव ओवाळून टाकतात. अलीकडेच एका चाहत्याने मधुराणीला एक भेट दिली आहे. जी पाहून मधुराणी अगदी भावनिक झाली आहे.

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मधुराणीच्या हातात एक भेटवस्तू दिसत आहे. ज्याचं रॅपिंग कव्हर काढताना ती दिसतेय. गिफ्ट उघडताच तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटते. हि भेट पाहून मधुराणीला अगदी सुखद धक्काच लागतो. मधुराणीला तिच्या एका चाहतीने एक सुंदर पेंटिंग गिफ्ट केलं आहे. हे पेंटिंग मधुराणीचं आहे. ज्यामध्ये ती आनंदाने फुलांची उधळण करताना दिसतेय आणि अत्यंत सुखावणाऱ्या भावना तिच्या चेहऱ्यावर दिसत आहेत.

मधुराणी प्रभुलकरने सोशल मिडीयावर हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे कि, ‘इतक्या प्रेमाने इतकं सुंदर painting कुणी करून पाठवल्यावर मन इतकं भरून येतं की डोळयातून वाहून जातं. शिल्पा पवार ह्या कलावतीचे खूप खूप आभार!!’. मधुराणीने शेअर केलेला हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. शिवाय यावर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत हे पेंटिंग तयार केलेल्या चाहतीचे कौतुक करत आहेत.