उद्या होणार हेमांगीची स्वप्नपूर्ती..; अभिनेत्रीची ‘ती’ Insta स्टोरी व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशक्ल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे विविध लूकमधील फोटो, व्हिडीओ, कॉमिक रिल्स, किस्से, अनुभव, आठवणी अशा विविध पोस्ट ती आवर्जून शेअर करताना दिसते. अनेकदा परखड आणि स्पष्ट स्वभावामुळे अव्यक्त विषयांवर अगदी सहजपणे हेमांगी व्यक्त होताना दिसते. राजकीय असो किंवा सामाजिक विषय हेमांगी त्यावर पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेते. अशातच हेमांगीने आता एक पोस्ट शेअर करत आपले स्वप्न पूर्ण होणार असल्याचे म्हटले आहे. काय आहे ती पोस्ट जाणून घेऊया…

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवीने आजवर विविध ढंगाच्या विविध आशयाच्या, विषयाच्या नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. हेमांगी कायम तिच्या वाटेला येणाऱ्या भूमिका अव्वल साकारते. प्रत्येक कलाकाराचे काही ना काही स्वप्न असते आणि असेच एक स्वप्न हेमांगीचे आहे. ज्याची उद्या पूर्तता होणार असल्याचे हेमांगीने स्वतः अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट शेअर करत सांगितले आहे.

हेमांगीने हि पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘‘रॅायल अॅापेरा हाऊस’, अनेक वर्षांपासूनचं स्वप्न होतं या वास्तूत, नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग करता यावा. २ सप्टेंबरला हे स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रचंड आनंद होत आहे. तुम्ही ही माझ्या या आनंदात सामील व्हायला नक्की या!’.

उद्या हेमांगी अभिनित ‘जन्मवारी’ या नाटकाचा प्रयोग मुंबईतील चर्नी रोड येथे असणाऱ्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये रंगणार आहे. यानिमित्त पहिल्यांदाच हेमांगी रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये प्रयोग करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हेमांगीचे हे स्वप्न होते आणि अखेर ते उद्या साकार होणार आहे.